सर्बियाचा प्रतिभावान टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावत एटीपी क्रमवारीत पहिल्या स्थानावर घेतलेली झेप त्याचा दर्जा दाखवून देण्यास पुरेशी ठरावी. ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेशी जोकोविचचे म्हणून वेगळे नाते आहे. कोरोनाची लस न घेतल्याने मागील वर्षी या स्पर्धेपासून त्याला वंचित रहावे लागले होते. किंबहुना, यंदा आपल्या आवडत्या स्पर्धेत सहभागी होत त्याने केलेली कामगिरी ऐतिहासिकच म्हणावी लागेल. ग्रीसच्या स्टिफानोस त्सित्सिपासचे आव्हान मोडून काढत तब्बल दहाव्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचा त्याने नोंदविलेला विक्रम त्याचे वर्चस्वच सिद्ध करतो. 2008 ला जोकोविचने पहिल्यांदाच या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. तेव्हापासून सातत्याने ऑस्ट्रेलियन ओपनवर त्याचा प्रभाव असल्याचे दिसून येते. 2011 ते 2013 व 2019 ते 2021 अशी सलग दोनदा त्याने नोंदविलेली हॅट्ट्रिक बरेच काही सांगून जाते. या दशकपूर्तीबरोबरच स्पेनच्या 36 वर्षीय राफेल नदालच्या 22 ग्रँड स्लॅम पदकांशी बरोबरी करत जोकोविचने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. यंदाची स्पर्धा आपल्यासाठी अत्यंत आव्हानात्मक होती, असे स्वतः तोच सांगतो. त्यावरून त्याच्या यशाची कल्पना येते. जोकोविचच्या टेनिस कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्यातून त्याच्या एकूणच कर्तृत्वाची खात्री पटते. दहा ऑस्ट्रेलियन जेतेपदासह विंबल्डनची सात, अमेरिकन ओपनची तीन, तर दोनदा प्रेंच ओपनवर त्याने आपली मोहोर उमटविल्याचे पहायला मिळते. ही कामगिरी विलक्षणच म्हटली पाहिजे. तसे जोकोविच, नदाल व फेडरर हे समकालीन. तिघेही तोडीस तोड. यातील 41 वर्षीय स्विल्झर्लंडच्या रॉजर फेडररचा खेळ अगदी राजस असाच. नजाकत, सौंदर्य ही त्याच्या खेळाची वैशिष्टय़े. बिम्बल्डनच्या हिरवळीवर त्याचा खेळ वेगळेच चैतन्य घेऊन फुलत असे. तब्बल 20 ग्रँड स्लॅम पदके मिळविणाऱया फेडररच्या या खेळाला आकडय़ात कसे बांधणार? नदाल म्हणजे टेनिसमध्ये धडधडणारी जणू रायफलच. त्याच्या खेळातील ऊर्जा पाहण्यासारखी, अनुभवण्यासारखी. प्रेंच ओपनच्या लाल मातीवर नदालला रोखणे म्हणजे केवळ दिवास्वप्नच. म्हणूनच लाल मातीचा वा क्ले कोर्टचा बादशहा ही उपाधी त्याला मिळालेली. या दोन दिग्गजांच्या मांदियाळीत आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणे, हे येरागबाळय़ाचे काम नाही. जोकोविचने ते केले. टेनिसच्या क्षितिजावर दोन महासागर आपल्या महाकाय लाटांनी जगाचे लक्ष वेधून घेत असताना या तिसऱया महाप्रवाहाने आपल्या अस्तित्वाची जाणीव विश्वाला करून दिली. अर्थात हा महाप्रवाह म्हणजे जोकोविच होय. कालपरवापर्यंत तो या दोघांच्या छायेत असल्यासारखा भासत असे. आज मात्र तो वेगळा भासतो. अर्थात यामागे त्याची प्रगाढ तपश्चर्या आहे, हे नाकारून चालणार नाही. आक्रमकता व कलात्मकता अशा दोहोंचा मिलाफ त्याच्या खेळात आढळून येतो. याशिवाय तंदुरुस्ती हे त्याचे बलस्थान होय. 35 वर्षांचा हा खेळाडू आपल्या आहाराबाबतही अत्यंत जागरूक असल्याचे सांगितले जाते. मागच्या काही वर्षांतील फेडरर आणि नदालचा प्रवास काहीसा अडखळताच राहिला. तंदुरुस्तीला या दोघांनाही सातत्याने सामोरे जावे लागले. स्वाभाविकच अनेकदा सामन्यातून अंग काढून घ्यावे लागले किंवा सामना अर्ध्यावर तरी सोडावा लागला. तसे नदाल व जोकोविचमध्ये वयाचे फारसे अंतर नाही. वयाने दोघेही जवळपास सारखेच. परंतु, नोव्हाकच्या चेहऱयावरील ताजेतवाणेपणा आता नदालमध्ये दिसत नाही. कोणत्याही खेळामध्ये फिटनेस हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. कारण त्यावरच कोणत्याही खेळाडूची कारकीर्द ठरत असते. हे पाहता तंदुरुस्तीच्या बाबतीत जोकोविच त्याच्या समकालीन खेळाडूंपेक्षा नक्कीच काही प्रमाणात सरस ठरावा. ऑस्ट्रेलियन ओपनमधील विजयानंतर 7070 गुण झाल्याने तो पुन्हा अव्वल स्थानी विराजमान होतो, हे लक्षणीयच. यापूर्वी विक्रमी 374 आठवडे हे स्थान टिकविण्याची किमयाही त्याच्याच नावावर आहे. आता सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपद पटकाविण्याचा विक्रमही त्याला खुणावत असेल. अर्थात याकरिता नदाल व त्याच्यामध्ये स्पर्धा असेल. किंबहुना, अजून बराच खेळ शिल्लक असल्याचे जोकोविचने दाखवून दिले आहे. त्यात एकूणच जिद्दी व महत्त्वाकांक्षी स्वभाव बघता त्याच्याकडून नक्कीच अपेक्षा असतील. उपविजेत्या त्सित्सिपासने सर्वकालीन सर्वोत्कृष्ट टेनिसपटू, अशा शब्दांत त्याचे केलेले वर्णन आकडय़ांच्या पातळीवर बरोबरच ठरावे. कारण या स्तरावर कदाचित फेडरर व नदालपेक्षा तो अधिक पुढे गेलेला असेल. परंतु, खेळामध्ये केवळ आकडय़ांचा विचार करून चालत नाही. तर खेळाचा दर्जा, खेळाडूची प्रतिभा याचे मूल्यमापन करावे लागते. त्या स्तरावर या तिन्ही खेळाडूंचे मूल्यांकन केले गेले, तर फेडररच सरस ठरतो, हे कोणताही दर्दी टेनिसप्रेमी मान्य करेल. स्वतः नदालनेच वेळोवेळी याबाबत कबुली दिली आहे. अर्थात यामुळे नोव्हाक जोकोविच याच्या खेळाचे मूल्य कमी होत नाही. त्याच्यात खिलाडूवृत्तीचा अभाव असल्याचीही काही जणांकडून टीका होते. तसेच त्याच्या तापटपणा व तुसडेपणाबद्दलही बोलले जाते. तथापि, एक खेळाडू म्हणून तटस्थपणे विचार केला, तर त्याच्या खेळाला दादच द्यावी लागते. टेनिस हा अत्यंत वेगळय़ा धाटणीचा खेळ आहे. टेनिसच्या इतिहासात वेगवेगळय़ा टेनिसपटूंनी आपल्या उच्चतम खेळाद्वारे यावर आपला अमीट ठसा उमटविलेला पहायला मिळतो. नोव्हाकही ही परंपरा समृद्धपणे पुढे नेत असल्याचे दिसते. कोरोना काळ, लसीकरण न करण्याची त्याची भूमिका, त्यातून निर्माण झालेले वादंग यामुळे हा सगळाच टप्पा त्याच्यासाठी खडतर होता. त्यातून बाहेर पडत एकेक मैलाचा दगड पार करणे, ही साधी सोपी गोष्ट नव्हे. जोकोविच आता त्या उंबरठय़ावर येऊन ठेपला आहे. विक्रमी हे मोडण्यासाठीच असतात. मात्र, नवीन विक्रम प्रस्थापित करण्यासाठी विक्रमवीरच जन्माला यावा लागतो. नोव्हाकला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!
Previous Articleतिरंगी टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिका विजेते
Next Article परफ्यूम बॉम्बच्या वापराचा कट
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.