केंद्र सरकारने भाग पाडू नये असे मुख्यमंत्र्यांसमोर विधान
वृत्तसंस्था/ नमक्कल
तामिळनाडूतील सत्तारुढ द्रमुक पक्षाचे खासदार ए. राजा यांनी केंद्र सरकारला इशारावजा शब्दांमध्ये तामिळनाडूला स्वायत्तता प्रदान करण्यास सांगितले आहे. स्वतंत्र तामिळनाडूची मागणी पुन्हा करण्यास भाग पाडू नका असे ए. राजा यांनी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या उपस्थितीत म्हटले आहे. तामिळनाडूला स्वायत्तता मिळत नाही तोवर आमची लढाई सुरूच राहणार असल्याचे विधान त्यांनी केले आहे.
पेरियार हे आयुष्यभर स्वतंत्र तामिळनाडूची मागणी करत राहिले. आमचे मुख्यमंत्री स्टॅलिन हे अण्णादुराई यांनी दाखविलेल्या मार्गावर वाटचाल करत आहेत. आम्हाला पेरियार यांचा मार्ग स्वीकारण्यास भाग पाडू नका. आमच्या राज्याला स्वशासनाचा अधिकार देण्यात यावा अशी विनंती आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे करत आहोत असे ए. राजा यांनी म्हटले आहे.
आम्ही तामिळनाडूच्या सत्तेवर आहोत. सत्तेत आहोत म्हणून ही भूमिका आम्ही मांडत नाही. द्रमुकने स्वतंत्र तामिळनाडूची मागणी सोडून दिली आहे. परंतु आता आम्ही राज्याच्या स्वायत्ततेची मागणी करत आहोत असे स्टॅलिन म्हणाले. या बैठकीत उपस्थित मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी या मुद्दय़ावर मात्र मौन बाळगले होते.
केंद्र सरकारकडे अधिक अधिकार आहेत. तर राज्य सरकारांना अनेक प्रकरणांमध्ये केंद्र सरकारवर अवलंबून रहावे लागते. जीएसटीमध्ये तामिळनाडूचे 6.5 टक्के योगदान आहे, परंतु राज्याला केवळ 2.2 टक्के निधीच परत मिळतो. छोटय़ा-छोटय़ा मुद्दय़ांवरही राज्य सरकारला केंद्र सरकारकडे धाव घ्यावी लागत असल्याचा दावा ए. राजा यांनी केला आहे.