Tarun Bharat

30 वर्षांचे होण्याआधी हे नक्की करा!

माणूस लहानपणापासून सतत काही ना काही शिकत असतो. पहिल्यांदा चालायला शिकणे, शाळेत जाऊन नवनवीन विषय शिकणे, समाजाची रीत शिकणे, नोकरी मिळवणे इत्यादी गोष्टी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत, ज्या माणसाचे पुढील आयुष्य परिपूर्ण बनवायला मदत करतात. एक चांगले आणि सुरक्षित आयुष्य घडवायला मदत करतात. प्रत्येक माणूस संपत्तीसारख्या जीवनावश्यक गोष्टी मिळवण्यासाठी खूप कष्ट करतो. पण त्या व्यतिरिक्तही काही गोष्टी जीवनासाठी आवश्यक आहेत, ज्यांच्याकडे माणूस बहुतेकवेळा दुर्लक्ष करतो. प्रत्येक वयोगटातील जबाबदाऱया पार पाडल्याच पाहिजेत. पण त्याच बरोबर अशा काही गोष्टी आहेत ज्या जीवनाला एक नवीन अर्थ
देतात.

नवीन मिळालेल्या जबाबदाऱया सांभाळण्यात तरुण पिढी इतकी गुंतून जाते की त्यांना आयुष्यातील छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा आनंद घेण्यासाठी वेळच मिळत नाही. प्रत्येक तरुण तरुणीला सांगितले जाते की शिक्षण पूर्ण झाले की आयुष्य सोपे होते, पण माणसाची खरी परीक्षा त्याने वय वर्षे 20 ओलांडल्यानंतरच सुरू होते. अशा वेळेला जबाबदाऱयांचे ओझे पाठीवर उचलताना या काही गोष्टींचा 20-30 वषीय तरुण तरुणींनी अनुभव नक्की घेतला पाहिजे.

1. रक्तदान आणि समाजसेवा

या जगात प्रत्येकजण भाग्यवान नाही. काही लोकांकडे जीवनातील मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे पैसे किंवा आरोग्य नसते. जर देवाने आपल्याला सुरक्षित आयुष्य आणि चांगले आरोग्य दिले असेल तर त्यातील जमेल तेवढे वंचितांमध्ये वाटणे हे आपले कर्तव्य आहे. जमेल तसा दानधर्म आणि रक्तदान केल्याने फक्त पुण्य लागत नाही तर एखाद्याचा जीव वाचवायलादेखील मदत होऊ शकते.

2. सांकेतिक भाषा शिका

मानव म्हणून आपण अनेकदा आपल्या ज्ञानेंद्रियांना गृहीत धरतो. अपंग लोकांकडे काही क्षमता नसल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. प्रतिभा आणि क्षमता असूनही संवादाच्या अभावामुळे त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळत नाही. अशा वेळेला प्रत्येकाने वेळ काढून सांकेतिक भाषा शिकण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मानवजातीसाठी एक नवीन सर्वसमावेशक जग निर्माण करण्यात सक्षम होऊ शकतो.

3. स्वयंपाक शिका

‘अन्न हे पूर्णब्रह्म’ हे आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते. अन्नाशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही. म्हणजेच जबाबदारीपेक्षा जास्त, ती एक गरज आहे. मग स्वयंपाक शिकण्याची जबाबदारी फक्त मुलींनीच का घ्यायची? प्रत्येक व्यक्तीला आपले स्वतःचे पोट भरता येईल एवढा तरी स्वयंपाक प्रत्येक तरुण तरुणीला करता यायला हवा. चांगले अन्न पोटात गेले तरच शरीर निरोगी राहील आणि ऊर्जा टिकून राहील.

4. एक खेळ शिका

यशप्राप्तीसाठी कठोर परिश्रम महत्त्वाचे आहेत परंतु त्याबरोबरच चांगले मानसिक आणि शारीरिक आरोग्यदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. अभ्यास आणि कामा बरोबर निरोगी राहण्यासाठी एखादा खेळ आत्मसात केला तर माणसाचे मन प्रसन्न होते. त्याचबरोबर इतर लोकांबरोबर मैदानी खेळ खेळले की तुम्ही टीममध्ये कसे काम करायचे आणि नवीन लोकांच्या संपर्कात कसे यायचे ते शिकता.

5. पैसे कसे गुंतवायचे ते शिका

तारुण्यात सगळेच नवीन असते. नवीन मिळालेल्या स्वातंत्र्यामध्ये आता स्वकमाईच्या पैशाचे  स्वातंत्र्यदेखील मिळालेले असते. अशावेळेला मनावरचा ताबा सुटणे साहजिक आहे. पण तारुण्यात बचत आणि गुंतवणूक करायला शिकले तर भविष्यातील आर्थिक व्यवस्थापन सोपे होऊ शकेल. आर्थिक व्यवस्थापन, कर, आणि नफा या सगळय़ा गोष्टी शाळेत शिकवल्या जात नाहीत. या विषयाकडे कुतूहलाने बघितले तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होणार आहे.

6. वरिष्ठाबरोबर वेळ घालवा आणि आपल्या संस्कृतीबद्दल जाणून घ्या

माणसाची संस्कृती ही त्याची ओळख आहे. तो कोणत्या घरात जन्मला आहे, कोणत्या ठिकाणी वाढला आहे, त्याच्या घरच्यांची धार्मिक मते काय आहेत या सगळय़ाचा प्रभाव त्याच्या आयुष्यावर नेहमीच पडत असतो. अशावेळेला आपल्या पूर्वजांच्या आणि आपल्या संस्कृतीबद्दल जाणून घेणे ही आपली जबाबदारी असली पाहिजे. आपल्या पूर्वजांनी कधीकाळी खूप परिश्रम केले असतील म्हणून आपल्याला हे आयुष्य मिळाले आहे, याचे भान ठेवून या संपत्तीचे जतन केले पाहिजे.

Group of young people laughing by seeing into smartphone – Millennials having fun with friends – trendy modern youth busy on mobile phone, Internet and social media.

7. खरे मित्र शोधा

आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक प्रकारची माणसे भेटतात. या जगात जितके चांगले लोक आहेत, तेवढेच वाईट लोकसुद्धा आहेत. अशावेळेला आपण अशा लोकांच्या सहवासात राहिले पाहिजे जे आपल्याला प्रेरित करतील आणि ज्यांच्या सोबत आपल्याला सुरक्षित वाटेल. म्हणतात ना, ‘माणसाची ओळख हे त्याचे मित्रमैत्रिणी कोण आहे यावरून ठरते.’

8. घरात ग्रंथालय सुरू करा

आज इंटरनेटद्वारे सर्व माहिती मिळवण्याचा फायदा आपल्याला आहे. हे खूप सोपे आहे आणि त्यासाठी कोणतेही कष्ट लागत नाहीत. पण इंटरनेटवर कोणीही काही पण अपलोड करू शकतात, त्यामुळे आम्ही माहितीची सत्यता तपासू शकत नाही. म्हणूनच वाचनाची सवय असणे चांगले आहे कारण त्याने आपले लक्ष, स्मरणशक्ती, अनुभूती आणि संवादकौशल्य सुधारते. विविध विषयांची पुस्तके वाचण्याची सवय ठेवली पाहिजे. त्यासाठी घरातच एखादे छोटे गंथालय तयार करा. म्हणतात ना, ‘वाचाल तर वाचाल!’

तारुण्य हे अतिशय अनिश्चित वय आहे. तारुण्यात मुले-मुली सतत बदलत असतात आणि विकसित होत असतात. त्यामुळे या सगळय़ा गोष्टींकडे आवर्जून लक्ष जात नाही. आणि हे वय पण असे आहे की नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी करायची इच्छा प्रत्येकाला होत असते. पण या काही छोटय़ा छोटय़ा गोष्टी आहेत ज्यांचा 20 वर्षांचे असल्यापासूनच विचार केला तर पुढे जाऊन जीवनाचा अधिक आनंद घेता येईल. आयुष्य खूप छोटे आहे आणि या आयुष्यात मिळणारे अनुभव अनंत आहेत. त्यामुळे प्रत्येक अनुभवाकडे कुतूहलाने बघितले पाहिजे.

20 ते 30 हे वय खूप ऊर्जेने भरलेले असते त्यामुळे त्यातील प्रत्येक क्षण सकारात्मक आयुष्य आणि समाज घडविण्यासाठी वापरला
पाहिजे.

 -श्राव्या माधव कुलकर्णी

Related Stories

युवा हृदयांची काळजी!

Omkar B

ऑनलाईन शॉपिंग-सायबर क्राईमचा दिवाळी फटाका

Amit Kulkarni

जो मनावर नियंत्रण मिळवतो, तो देवांचाही देव होतो

Patil_p

बुडत्याचा पाय खोलात म्हणजे सध्याची काँग्रेस

Patil_p

जनताभिमुख होण्याची गरज !

Patil_p

रामाचे गान आणि गाण्यातला राम

Omkar B