जनरल बाजवांच्या निर्देशावर आयएसआयचा आदेश
वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्या निर्देशावर गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडून स्वतःच्या कमांडर्सना राजकीय नेते आणि राजकीय सभांपासून दूर राहण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. पाकिस्तानी सैन्य आणि राजकारण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे मानले जाते. अशा स्थितीत हा आदेश चकित करणारा आहे.
या आदेशाचे पालन करणाऱया अधिकाऱयांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक स्तरीय कमांडर्सना या आदेशांचे पालन करावे लागेल. या आदेशाचे उल्लंघन महागात पडणार असल्याचा इशारा आयएसआयकडून देण्यात आला आहे. या आदेशाचे पालन न केल्यास संबंधिताची आयएसआयमधून हकालपट्टी केली जाणार आहे.
इम्रान खानकडून प्रश्नचिन्ह
सैन्यप्रमुख बाजवा यांनी स्वतःचे कमांडर्स तसेच मुख्य अधिकाऱयांना राजकारणापासून दूर राहण्यास सांगितले आहे. देशात सैन्याच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेमुळे झालेली बदनामी दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. एप्रिल महिन्यात इम्रान खान यांच्या पक्षाचे सरकार कोसळले होते. तेव्हापासूनच सैन्य आणि सुरक्षा यंत्रणांवर राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचे आरोप होत आहेत. आपले सरकार पाडण्यासाठी रचलेल्या कटाला अमेरिकेचे समर्थन मिळाल्याचा आरोप करत इम्रान यांनी एकप्रकारे सैन्याला लक्ष्य केले होते.
सैन्यावर आरोप
इम्रान आणि त्यांच्या पक्षाने सैन्यावर आरोप केला होता. इम्रान यांनी आता सैन्याच्या विरोधात राजकीय आघाडी उघडली आहे. सोशल मीडियावर इम्रान हे अत्यंत आक्रमक असून थेट पणे ते सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱयांकडे अंगुलीनिर्देश करत आहेत. इम्रान यांच्या पक्षाने एका धारणेला बळ देण्यास सुरुवात केली आहे. याच्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणा कशाप्रकारे राजकीय घडामोडींमध्ये सामील आहेत हे सांगण्यात येत आहे. आगामी निवडणुकांमध्ये पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी सैन्य कट रचत असल्याचे इम्रान यांचे म्हणणे आहे.
सैन्याचा कट
आयएसआयचे कमांडर इम्रान यांच्या पक्षाविरोधात राजकीय डावपेच खेळत आहेत असा आरोप पीटीआयच्या वरिष्ठ नेत्या यास्मिन राशिद यांनी केला आहे. परंतु त्यांनी कुठलाही पुरावा दिलेला नाही. यास्मिना या इम्रान सरकारमध्ये आरोग्यमंत्री होत्या. तर पीटीआयचे अध्यक्ष तसेच उपाध्यक्षांकडूनही अशाचप्रकारचा दावा करण्यात आला आहे. पंजाब प्रांतात लवकरच पोटनिवडणूक होणार असून याचा निकाल इम्रान यांच्या पक्षासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.