ऍलोपथीसंबंधी बाबा रामदेव यांच्या वक्तव्यांवर उच्च न्यायालयाची टिप्पणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ऍलोपथी आणि कोरोनावरी उपचारासंबंधी बाबा रामदेव यांनी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी सुनावणी करत दिल्ली उच्च न्यायालयाने जनतेची दिशाभूल करू नका असे सुनावले आहे. बाबा रामदेव यांच्यावर कोरोना उपचारासंबंधी चुकीची माहिती पसरविण्याचा आरोप आहे.
बाबा रामदेव यांनी कोरोनावरील उपचाराच्या पद्धतींवरून डॉक्टरांवर टीका केली होती. 2021 मध्ये प्रसारित झालेल्या एका व्हिडिओत बाबा रामदेव हे ‘कोरोनासाठी ऍलोपथिक औषधे घेतल्यावर लाखो लोक मृत्युमुखी पडल्याचे’ म्हणत असताना दिसून आले होते. त्यांच्या या टिप्पणीला डॉक्टरांच्या संघटनांनी तीव्र विरोध केला होता. दिल्ली मेडिकल असोसिएशनने उच्च न्यायालयात बाबा रामदेव यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती.
ऍलोपथीविरोधात कुणाचीही दिशाभूल केली जाऊ नये. मी लस टोचून घेणार नाही हे सांगणे वेगळी बाब आहे, परंतु लस विसरा, ती उपयुक्त नाही हे सांगणे हा दुसराच प्रकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने ऍलोपथी आणि ऍलोपथिक डॉक्टरांच्या विरोधात टिप्पणीसाठी बाबा रामदेव यांना मानहानीची नोटीस बजावली होती. यात 15 दिवसांमध्ये माफी मागावी, अन्यथा 1 हजार कोटी रुपयांची भरपाईची मागणी करू असे नोटीसमध्ये नमूद होते. दिल्ली उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना मागील एक वर्षी नोटीस बजावली होती.