प्रतिनिधी / बेळगाव
अमेरिकेच्या फिलाडेल्फीया येथील थॉमस जेफरसन युनिर्व्हसिटीने डॉ. प्रभाकर कोरे यांना त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल मानद डॉक्टरेट बहाल केली आहे. अशी पदवी मिळविणारे डॉ. प्रभाकर कोरे हे पहिले भारतीय आहेत. 25 मे रोजी युनिर्व्हसिटीचे सीईओ एच. रिचर्ड हॅवरास्टिक व उपाध्यक्ष उपकुलगुरु मार्क एल. टायकोसिन्सकी यांच्या उपस्थितीत ही पदवी देण्यात आली.
डॉ. प्रभाकर कोरे यांनी 1984 पासून केएलई सोसायटीची धुरा सांभाळली आहे. संस्थेचे आधुनिकीकरण करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. जेएनएमसीमध्ये महिला आणि बालकांचे आरोग्य संशोधन केंद्राच्या स्थापनेतही डॉ. कोरे यांनी पुढाकार घेतला. प्रसूती काळात माता मृत्यूंचे प्रमाण रोखण्यासाठी या केंद्राने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. त्यासाठी समुदाय आधारित बहुद्देशीय, बहुकेंद्रीय कार्य डॉ. कोरे यांनी केले. याचे तळागाळापर्यंत दूरगामी परिणाम दिसून आले.
भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने व जागतिक आरोग्य संघटनेने याची दखल घेतली. आता हा विभाग जागतिक आरोग्य संघटना पुरस्कृत सेंटर फॉर रिसर्च ईन मॅटर्नल ऍण्ड पेरीनेटल हेल्थ म्हणून ओळखला जाता. या शिवाय काहेर विद्यापीठ आणि जेफरसन विद्यापीठ यांच्यामध्ये न्युरॉलॉजी, रेडिऑलॉजी, निओनेटॉलॉजी, सायकिऍट्री व नर्सिंग आणि फिजिओथेरपी क्षेत्रात संशोधनासंदर्भात अनेक करार झाले आहेत.