ओरोस /प्रतिनिधी-
अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याची माहिती न देता तिच्यावर गर्भपात संबंधाने औषधोपचार केल्याप्रकरणी निगडी पुणे येथील संशयित डॉ श्रीमती स्वरूप सुधीर पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा विशेष न्यायाधीश सानिका जोशी यांनी फेटाळून लावला आहे. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले. या प्रकरणी डॉ पाटील यां खाजगी वैद्यकीय अधिकाऱ्यासह पुणे येथील शासकीय वैद्यकीय अधिकारी रोहित शांतीलाल डिंबर ३१ यांच्यावर भादंवि कलम ३१२ सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम नुसार गुन्हा दाखल आहे. तर मालवण तालुक्यातील एका विधी संघर्षग्रस्त बालकावर भादंवि कलम ३७६, ३७६ ३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालवण तालुक्यातील आपल्या मामाकडे जानेवारी ते मार्च २०२२ या कालावधीत रहायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केला होता. जून २०२२ मध्ये पुणे निगडी येथील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले होते. यावेळी ती गर्भवती असल्याचे निष्पन्न होऊनही याबाबतची माहिती पोलिसांना न देता तिचा गर्भपात घडवून आणण्यासाठी उपचार केले, असा ठपका डॉ पाटील यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी डॉ श्रीमती पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यावरील सुनावणीत सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून डॉ पाटील यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला.