ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महागाईची झळ सोसणाऱ्या सर्वसामान्य जनतेला पेट्रोलियम कंपन्यांनी आणखी एक झटका दिला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापराच्या LPG गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे. 14.2 किलोच्या सिलिंडरमध्ये 50 रुपयांची तर 5 किलोच्या गॅस सिलिंडरच्या दरात 18 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचे बजेट आता कोलमडणार आहे.
आज झालेल्या दरवाढीनंतर 14.2 किलोच्या LPG गॅस सिलिंडरच्या दराने एक हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईत या सिलिंडरसाठी 1052.50 रुपये मोजावे लागणार आहेत. दिल्लीत 1053 रुपये, कोलकातामध्ये 1079 रुपये तर चेन्नईत 1068.50 रुपये मोजावे लागणार आहेत. याआधी मे महिन्यात घरगुती LPG गॅस सिलिंडरच्या दरात चार रुपयांची वाढ झाली आहे. मागील एक वर्षात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात जवळपास 200 रुपयांची वाढ झाली आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात
19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 8.50 रुपयांची कपात झाली आहे. 6 दिवसांत दुसऱ्यांदा व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. यापूर्वी 1 जुलै रोजी व्यावसायिक गॅस दरात 198 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा 8.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. मुंबईत 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर 1975.50 रुपये, दिल्लीत 2012.50 रुपये, कोलकातामध्ये 2132 तर चेन्नईत 2177.50 रुपयांना मिळत आहे.