स्वदेश दर्शन अंतर्गत विकसित जेटीचे लोकार्पण
प्रतिनिधी/ पणजी
गोव्याला भेट देणाऱ्या जगभरातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षणस्थळ असलेल्या दोनापावल जेटीचे अखेर लोकार्पण करण्यात आले. स्वदेश दर्शन अंतर्गत विकसित करण्यात आलेली ही जेटी राज्यातील पर्यटन क्षेत्राला वेगळा आयाम देणारी ठरणार आहे, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले. त्याचबरोबर तेथे दर्जेदार पर्यटकच यावे या उद्देशाने अल्प अशी प्रवेश फीही लागू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या कित्येक वर्षांपासून दुऊस्तीच्या नावाखाली पूर्णत: बंद करण्यात आलेल्या या जेटीमुळे पर्यटकांचा हिरमोड होत होता. प्रारंभी वर्ष 2018 मध्ये ती धोकादायक ठरवून बंद करण्यात आली व नंतर फेब्रुवारी 2021 मध्ये तिची दुऊस्ती हाती घेण्यात आली. चार वर्षांनंतर आता तिचे लोकार्पण करण्यात आले. त्यानिमित्त शनिवारी आयोजित कार्यक्रमात श्री. खंवटे बोलत होते. त्यावेळी आमदार केदार नाईक यांच्यासह पर्यटन खात्यातील अधिकारी, नगरसेवक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना खंवटे यांनी, स्वदेश दर्शन अंतर्गत राज्यभरात आणखीही कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून ग्रामीण पर्यटन विकसित करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. त्याद्वारे तेथेही पर्यटनास चालना मिळणार असून बारमाही पर्यटन स्थळ म्हणून गोव्याचा लौकिक अधिक वाढेल, असे ते म्हणाले.
राज्यात पर्यटनाला उर्जीतावस्था देतानाच ते क्षेत्र अधिक बहरण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न यशस्वी झाल्यास राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल, असा विश्वास खंवटे यांनी व्यक्त केला. लोकार्पण करण्यात आलेल्या या जेटीचे अद्याप काही काम शिल्लक असून ते लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, फीत कापून जेटीचे लोकार्पण केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पर्यटनमंत्र्यांनी या जेटीवर जाण्यासाठी प्रवेश शुल्क आकारण्यात येणार असल्याचे सांगितले. देशातील अनेक पर्यटन स्थळांवर प्रवेशासाठी शुल्क आकारण्यात येते. कुतुबमिनार पाहण्यासाठी 250 ऊपये शुल्क भरावे लागते. त्या तुलनेत आमचे शुल्क हे अत्यल्प म्हणजेच मुलांसाठी 25 ऊपये तर 18 वर्षांवरील सर्वांसाठी 50 ऊपये असेल, असे त्यांनी सांगितले. मात्र हे शुल्क केवळ पर्यटकांसाठी असेल व गोमंतकीयांना तेथे प्रवेश नि:शुल्क असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रम जणू ठरला एकतर्फी
जेटीच्या लोकार्पणाचा हा कार्यक्रम एकतर्फी म्हणावा असाच झाल्याच्या प्रतिक्रिया लोकांमधून उमटत होत्या. कार्यक्रमाला मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, स्थानिक आमदार जेनिफर मोन्सेरात, महापौर रोहित मोन्सेरात, पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष आमदार गणेश गावकर आदी मान्यवर उपस्थित राहणार होते. त्या सर्वांची नावेही कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका तथा वर्तमानपत्रातील जाहिरातीमधून प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु त्यापैकी कुणीही तेथे फिरकले नाहीत, त्यामुळे तो चर्चेचा विषय बनला होता.
उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना तर या कार्यक्रमात जसे काही डावलण्यातच आले. खरेतर ही जेटी पेंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेतून विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे श्रीपाद नाईक यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत असणे आवश्यक होते, असेही कार्यक्रमस्थळी उपस्थित काहीजण बोलत होते.