प्रतिनिधी /काणकोण
चावडी, काणकोण येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या देणगी कूपन विक्रीचा शुभारंभ करणारा समारंभ नुकताच पार पडला. मागच्या दोन वर्षांत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे या मंडळाला देखील आतषबाजी, सांस्कृतिक कार्यक्रम, देणगी कूपन यांना कात्री लावावी लागली होती. पण यंदाचा उत्सव मात्र मोठय़ा उत्साहात साजरा करण्याचे गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठरविले आहे. चावडी गणेशोत्सव मंडळ हे तालुक्यातील जुने मंडळ असून देणगी कूपन विक्रीच्या माध्यमातून मिळालेली रक्कम केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांवरच खर्च न करता तालुक्यातील हुशार विद्यार्थ्यांचा गौरव, गरजू व्यक्तींना वैद्यकीय मदत अशा प्रकारच्या उपक्रमांवरही खर्च करत आलेली आहे. या देणगी कूपन विक्री शुभारंभ सोहळय़ाला काणकोणचे नगराध्यक्ष सायमन रिबेलो, स्थानिक नगरसेवक रमाकांत ना. गावकर, मंडळाचे अध्यक्ष सोपान ना. गावकर, सचिव अजय फळदेसाई, खजिनदार अजित ना. गावकर तसेच मोहन काणकोणकर, दीपक देसाई, प्रमोद ना. गावकर आणि अन्य सदस्य उपस्थित होते.