कोरोनाच्या महाभयानक उद्रेकातून आता कोठे जग बाहेर पडताना दिसत आहे. जगातील निम्म्याहून अधिक लोकांना कोरोना विषाणूंची बाधा झालेली होती, असे आता ज्ञान होत आहे. यांपैकी काही लोकांची प्रकृती खूपच बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्याची वेळ आली. लक्षावधींचा मृत्यू या कोरोनामुळे झाला. जे बरे झाले त्यांच्यातही कोरोनाने आपल्या पाऊलखुणा सोडल्या आहेत. या बाधेमुळे अनेकांच्या मेंदूच्या क्षमतेवर विपरीत परिणाम झाला असून त्यांचा मेंदू वेगाने काम करेनासा झाला आहे. या व्याधीला ‘बेन फॉगिंग’ असे नाव आहे.
या बेन फॉगिंगपासून सुटका करुन घेण्यासाठी काहीजण डोक्याला विजेचा सैम्य धक्का देण्याचा उपाय करीत आहेत. यामुळे फॉग किंवा मेंदूची मंदगती जाऊन तो पूर्वीसारखे काम करु लागेल अशी समजून यामागे आहे. असे शॉक्स काहीवेळा दिले जातात. ती एक अधिकृत उपचारपद्धती आहे. मात्र, ती करण्याचा अधिकार केवळ आणि केवळ तज्ञ डॉक्टरांनाच आहे. त्यांनी ही उपचारपद्धती सांगितली असेल तरच आणि त्यांच्याच अधिपत्याखाली ती पार पडावी लागणार आहे. तथापि, डॉक्टरचा खर्च नको म्हणून अनेकजण इंटरनेटवरच्या अनधिकृत आणि दिशाभूल करणाऱया माहितीच्या आधारावर हे अघोरी प्रयोग करीत आहेत. अशामुळे उपायापेक्षा अपाय होण्याची शक्यता दाट आहे, असा इशारा देण्यात आला आहे.
या पद्धतीला ब्रेन स्टिम्युलेशन सिस्टिम असे म्हणतात. ती सर्वांसाठी नसते. हे उपचार केवळ रुग्णालयांमध्ये आणि तज्ञांच्या देखरेखीखालीच करावे लागतात. मात्र काही बेदरकार आणि बेजबाबदार लोक स्वतःच्या घरात हे नसते प्रयोग करुन स्वतःला धोक्यात घालताना दिसतात. तेव्हा सावध राहणे आवश्यक आहे. हे उपचार घरात करायचे असतील तरीही विशेष उपकरण खरेदी करावे लागते, जे महाग आहे. तसेच घरातही ते डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच करावे लागतात.