नवरी कितीही किंमती लेहंगा किंवा डिझायनर साडीत नटली तरी जोपर्यंत ती मेहंदीने सजलेल्या हातात चुडा भरत नाही तोपर्यंत तिचे सौंदर्य खुलत नाही असे म्हणतात ते काही खोटं नाही. पंजाबी परंपरेतही या चुडय़ाला आणि त्यासोबत घातल्या जाणाऱया कलीराला खूप महत्त्व आहे. कपूर घराण्याची सून बनून येताना आलियानेही लग्नात परिपूर्ण असा पंजाबी लूक केला होता.
त्यासाठी लाल बांगडय़ांच्या चुडय़ासोबत आलियाने मोती, स्टार आणि कुंदनने जडवलेला कलीरा घातला तर बोटात रणबीरने खास गिफ्ट दिलेली हिऱयाची अंगठीही तिने हौसेने घातली. नखशिखान्त नटलेल्या आलियाच्या कलीरा आणि हिऱयाची अंगठी या दोन दागिन्यांवरून मात्र पाहणाऱयाची नजर हटता हटत नव्हती. हलकासा मेकअप, पेस्टल रंगाच्या साडीसोबत डोक्यावरून घेतलेली चुनरी, मोकळे सोडलेले केस, भांगात लावलेला माथाटिका, गळाभर नेकलेस, कानात लांब झुमके या लूकमध्ये आलियाने साधेपणात किती सौंदर्य असतं हे दाखवून दिलं. खरंतर आलियाला आजपर्यंत अनेक सिनेमात नववधूच्या रूपात तिच्या चाहत्यांनी पाहिलं आहे आणि ऑनक्रिन प्रत्येक लूकमध्ये आलियाने कमाल केली आहे. 14 एप्रिल हा दिवस तिच्या खऱया आयुष्यातील महत्त्वाचा दिवस होता. तिच्या लग्नात ती कशी दिसेल, लेहंगा घालेल की साडी नेसेल, कोणत्या रंगाची थीम असेल असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले होते. लग्नानंतर आलियाने तिचे लग्नाचे खास फोटो इन्स्टापेजवर शेअर केले.