सोमवार ऐवजी मंगळवारी सुरु करा अधिवेशन, विजय सरदेसाई यांचा हल्लाबोल
प्रतिनिधी /पणजी
सरकारने सभापतीना आपला कर्मचारी असे संबोधू नये, असे निवेदन करून गोवा फॉरवर्ड नेते विजय सरदेसाई यांनी अधिवेशन सोमवार ऐवजी मंगळवारी सुरू करा. परंतु खासगी कामकाजाचा दिवस टाळू नका, अशी जोरदार मागणी केली आहे.
राज्य विधानसभेत विरोधी पक्षाकडे केवळ 7 आमदार आहेत. त्यातील विजय सरदेसाई हे एकमेव अनुभवी व ज्येष्ठ आमदार ठरतात. इतर 6 यामध्ये विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा देखील समावेश आहे. या नव्या आमदारांना काही माहीत असणार नाही म्हणून त्यांच्यापासून माहिती लपविण्याचा या सरकारचा इरादा दिसतोय. त्यामुळेच सभापतींनी 5 वर्षाच्या पलीकडची माहिती देणार नाही, असा नवा नियम काढला.
विजय सरदेसाई यांनी या प्रकाराबद्दल तिव्र संताप व्यक्त करताना सभापती हे उच्च पद आहे. त्या पदाची गरिमा तशीच व्हावी. विद्यमान सरकार सभापती हे आपले कर्मचारी आहे. अशा पद्धतीने वागतेय ते बरोबर नाही. या पदाचा मान राखा. सभापती हे या सभागृहाचे मुख्य आहेत आणि त्यांना सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या आमदारांची मते आणि मने जाणून घेऊन सर्वांनाच न्याय देणे आवश्यक असते व तसे केले नाही तर लोकशाहीची ती हत्या झाल्याप्रमाणे होईल. सरकारला गप्प रहाणारे विरोधी पक्ष हवेत तर तसे ते चालणार नाही. सभापतींकडून विरोधी पक्षांचे हित जपण्याचे काम झाले पाहिजे, त्याचे उल्लंघन होता कामा नये.
सभापतींनी आपला निर्णय मागे घ्यावा
सर्वसामान्य जनतेला माहिती हक्क कायद्यांतर्गत 20 वर्षांपर्यंतची सविस्तर माहिती मिळते आणि इथे निवडून आलेल्या जनप्रतिनिधींना 5 वर्षापर्यंतच्या माहितीचीच अट घालणे हा आमदारांचा अवमान आहे. सभापतीनी आपला निर्णय मागे घ्यावा. त्याचबरोबर विधानसभा अधिवेशन जर 45 दिवसांचे घ्यावयाचे असेल तर सोमवार ऐवजी मंगळवारी सुरू करा जेणेकरून शुक्रवार हा खासगी कामकाजाचा दिवस त्यात येईल आणि विरोधी आमदारांनाही आपली मते मांडण्याची संधी प्राप्त होईल, अशी मागणी विजय सरदेसाई यांनी केली.