Tarun Bharat

वाट नका पाहू, कारवाई करा सुरू!

निवडणुका जवळ आल्या आहेत. मतदारांना आमिषे दाखविण्याचे प्रकार सुरूच आहेत. कोण कुकर वाटतो तर आणखी कोण मिक्सर देतो, कोणी घरोघरी भेट देऊन महिलांना साडय़ा वाटत आहेत. केवळ आचारसंहिता जारी असतानाच सरकारी यंत्रणेला असे प्रकार रोखण्याचा अधिकार मिळतो का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे गेल्या आठवडय़ात बेंगळूरला आले होते. आपल्या या कर्नाटक दौऱयात त्यांनी राज्यातील पोलीसप्रमुख, जिल्हाधिकारी व जिल्हा पंचायतींच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांची बैठकही घेतली. मतदारांना प्रलोभने दाखविणाऱयांवर आतापासूनच कारवाई सुरू करा, यासाठी आचारसंहितेची वाट पाहात बसू नका, अशी स्पष्ट सूचना त्यांनी दिली आहे. तरीही राज्यात एकाही प्रकरणात कारवाई झाल्याचे पाहण्यात आले नाही. केवळ भेटवस्तूच नव्हे तर जेवणावळी उदंड झाल्या आहेत. देवदेवतांच्या मंदिरात मांसाहारी जेवणाचे आयोजन केले जात आहे. जेणेकरून याला धार्मिक कार्यक्रमाचे स्वरुप देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी कर्नाटकात सुरू असलेल्या सध्याच्या घडामोडी व उघड उघड आमिषे दाखविली तरी एकाही प्रकरणात कारवाई न करता कानाडोळा करणारे अधिकारी यांच्यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस, महसूल आदी विविध खात्यातील अधिकाऱयांच्या बदल्या झाल्या आहेत. तरीही राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांना मदत करणाऱया, पक्षपाती करणाऱया अधिकाऱयांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला आहे. जर राजकीय पक्षांना एखादा अधिकारी पक्षपातीपणे वागवत असल्याचे दिसून आले तर अशा अधिकाऱयांविरुद्ध कोणीही तक्रार करू शकते, अशीही घोषणा त्यांनी केली आहे. सध्या तरी आपल्याला पाहिजे त्या अधिकाऱयाची वर्णी लावून निवडणुकीत कसा विजय मिळवायचा? जे आपले ऐकत नाहीत त्यांना कसा धडा शिकवायचा, या विचारात अनेक राजकीय नेते आहेत. निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा करू नका, असा सल्ला दिला असला तरी आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोस्टींगसाठी राजकीय नेत्यांची चाकरी ही अधिकाऱयांना करावीच लागते.

निवडणूक आयोगाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या निवडणुकीत कर्नाटकात प्रथमच 80 वर्षांवरील मतदारांना घरबसल्या मतदान करता येणार आहे. गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या मतदारांनाही ही सुविधा मिळणार आहे. गुजरातसह अनेक राज्यात हा प्रयोग झाला आहे. कर्नाटकात प्रथमच तो राबविला जात आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकात 12 लाख 15 हजार 763 ऐंशी वर्षांवरील मतदार आहेत. तर 16 हजार 976 मतदारांनी आयुष्याची शंभरी गाठली आहे. त्यांना घरबसल्या मतदान करता येणार आहे. निवडणूक आयोगाने ही मुभा दिल्यामुळे वृद्ध मतदारांना सहजपणे मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. एकीकडे सत्ताधारी भाजप, प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस व निजद नेते पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत तर दुसरीकडे निवडणुकीसाठी सरकारी यंत्रणा सज्ज होत आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर साहजिकच आचारसंहिता जारी होते. त्यावेळी जेवणावळी देता येत नाहीत. भेटवस्तूही वाटता येत नाहीत. म्हणून आता अनेकांनी याचा सपाटाच लावला आहे.

भाजप प्रचार समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. गेल्या आठवडय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंडय़ा दौऱयावर आले होते. बेंगळूर-म्हैसूर एक्स्प्रेस हायवेचे उद्घाटन करून पंतप्रधानांनी मंडय़ामध्ये रोड शो केला. त्याआधी काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. मंडय़ाच्या खासदार सुमलता यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा व्यक्त केला. सुमलता या अपक्ष खासदार आहेत. प्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेते अंबरीश यांच्या त्या पत्नी आहेत. अंबरीश यांच्या निधनानंतर त्यांना मंडय़ा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागली. सिद्धरामय्या सरकारमधून अंबरीश यांना मंत्रिपदावरून बाजूला सारण्यात आले होते. या अपमानानंतर अंबरीश काँग्रेसपासून दूर गेले. स्वतः त्यावेळचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव बी फॉर्म घेऊन त्यांच्या घरी गेले तरी आपण निवडणूक लढविणार नाही, या निर्णयावर ते ठाम राहिले. सुमलता यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे चिरंजीव निखिल कुमारस्वामी यांचा पराभव करून त्या खासदार झाल्या. मंडय़ा, हासन जिल्हय़ावर निजदचा वरचष्मा आहे. त्याला सुरुंग लावत खासदार झालेल्या सुमलता यांना त्यावेळी काँग्रेस व भाजपने आपला उमेदवार न उतरविता अप्रत्यक्ष मदत केली होती. शेवटी त्यांनी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. नियमानुसार निवडणुकीच्या सहा महिन्यात अपक्ष खासदाराला एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश करता येतो. आता चार वर्षे उलटली म्हणून त्यांना थेट पक्षप्रवेश करता येत नाही. ही तांत्रिक बाजू लक्षात घेऊन त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. मंडय़ा येथील कार्यक्रमात सुमलता यांनी पंतप्रधानांना सेंद्रिय गूळ भेट दिला. दक्षिणेत पक्षाचा प्रभाव वाढविण्यासाठी सुमलता यांची भाजपला मदतच होणार आहे.

निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदी बी. एस. येडियुराप्पा यांची निवड होणार, अशी अटकळ होती. कारण लिंगायतींची एकगठ्ठा मते खेचून आणण्याची ताकद या एकाच नेत्यात आहे, हे पक्षाला अवगत आहे. ही अटकळ खोटी ठरवत मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची प्रचार समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यपदी बी. एस. येडियुराप्पा व त्यांचे चिरंजीव बी. वाय. विजयेंद्र यांची वर्णी लागली आहे. मंत्री व्ही. सोमाण्णा हे सध्या आपल्याच पक्षावर नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येडियुराप्पा आणि विजयेंद्र यांच्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. इतर काही आमदारांप्रमाणेच सोमाण्णा सुद्धा काँग्रेसच्या वाटेवर आहेत. त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. बुधवारी नवी दिल्ली येथे त्यांनी धर्मेंद्र प्रधान, अरुण सिंग आदी नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. या नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर त्यांची नाराजी दूर होणार की कायम राहणार? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. या बेबनावाचा लाभ उठवण्यासाठी काँग्रेस मात्र टपून बसला आहे.

रमेश हिरेमठ

Related Stories

पडद्यापलीकडची ‘नायिका’

Patil_p

चीनमधील आंदोलने

Patil_p

कोकणातील बालेकिल्ल्यातही शिवसेनेला धक्का!

Patil_p

स्मर तव वैरी संभवला

Patil_p

निवडणुकीच्या कुरुक्षेत्रातील उमेदवार आणि दावेदार

Patil_p

मुलांसाठी “ऑनलाईन’’ असणे…पालक शिक्षक यांची कसरत

Patil_p