क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय मुलींच्या प्राथमिक व माध्यमिक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जी. जी. चिटणीस संघाने मदनी संघाचा तर माध्यमिक गटात ज्ञान मंदिर संघाचा पराभव करून दुहेरी मुकुट पटकाविला.
मदनी स्कूलच्या मैदानावर झालेल्या हॉकी स्पर्धेत प्राथमिक गटातील अंतिम सामन्यात जी. जी. चिटणीस संघाने मदनी स्कूल संघाचा 3-0 अशा गोलफरकाने पराभव करून विजेतेपद पटकाविले. चिटणीसतर्फे वैष्णवी इटनाळ, श्रेया गोल्लोळी व शेजल भावी यांनी प्रत्येकी 1 गोल केला. माध्यमिक गटात झालेल्या अंतिम सामन्यात जी. जी. चिटणीस संघाने ज्ञानमंदिर संघाचा 4-0 असा पराभव केला. चिटणीसतर्फे भूमी कुगजीने 2 गोल, प्राची कदम व निशा गवळी यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे शहर पीईओ जे. बी. पटेल, खलील कोतवाल, प्रवीण पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाचे कौतुक करण्यात आले. यावेळी प्रशिक्षक जयसिंग धनाजी, बापू देसाई, आर. पी. परीट, संगोळ्ळी आदी उपस्थित होते.