

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
पदवीपूर्व शिक्षण खाते व एसएस समिती जगदीश सौंदत्ती पदवीपूर्व महाविद्यालय आयोजित जिल्हास्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत मुलामुलींच्या गटात आरपीडी संघाने जीएसएस संघाचा पराभव करून दुहेरी मुकुट पटकाविला.
एसएस समिती महाविद्यालयाच्या मैदानावर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पदवीपूर्व शिक्षण खात्याचे डीडीपीयू नागराज व्ही., संस्थेचे चेअरमन विनोद पाटील, राष्ट्रीय ज्युडो प्रशिक्षिका रोहिणी पाटील, मुख्याध्यापिका विद्या वग्गण्णावर व गिरीष मोरे आदी उपस्थित होते. सर्व संघांची ओळख करून व चेंडू पास करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. मुलींच्या गटात सामन्यात आरपीडी संघाने सौंदत्ती संघाचा 4-0 असा पराभव केला. आरपीडीतर्फे अपूर्वाने 3 तर वैभवी बुद्रुकने 1 गोल केला. दुसऱया सामन्यात जीएसएसने सौंदत्ती संघाचा 1-0 असा पराभव केला. जीएसएसतर्फे साक्षीने गोल केला. अंतिम सामन्यात आरपीडी संघाने जीएसएस संघाचा 6-0 असा पराभव केला. त्यात अपूर्वा व वैभवी बुद्रुक यांनी प्रत्येकी 2 तर मनिषा शिग्गीहळ्ळी व साक्षी पाटील यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
मुलांच्या गटात पहिल्या उपांत्य सामन्यात आरपीडी संघाने सौंदत्ती संघाचा 5-2 असा पराभव केला. आरपीडीतर्फे अनूज जनगौडाने 5 गोल केले. दुसऱया उपांत्य सामन्यात जीएसएसने स्वामी विवेकानंद खानापूर संघाचा 3-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात आरपीडीने जीएसएसचा 5-0 असा पराभव केला. आरपीडीतर्फे अनूजने 5 गोल केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे आरएलएस महाविद्यालयाचे निवृत क्रीडा प्राध्यापक जी. एन. पाटील, रामकृष्ण एन., गिरीश आदि मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी विनय नाईक, देवेंद्र कुडची, गिरीश मोरे आदी उपस्थित होते.