दूध वाहनाच्या चालकास जाब विचारल्याने चाकू हल्ला : दोघा संशयितांचा शोध सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
शिंदोळी, ता. बेळगाव येथे रविवारी रात्री उशिरा घडलेले दुहेरी खून क्षुल्लक कारणावरून झाले आहेत. दूध वाहनाचा चालक व त्याच्या साथीदाराने चाकूने भोसकून दोघा जणांचा खून केला असून मारिहाळ पोलीस त्या दोघा जणांचा शोध घेत आहेत. सोमवारी सिव्हिल
हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
गिरीश यल्लाप्पा नागुण्णावर (वय 24), बसवराज मारुती बेळगावकर (वय 24) दोघेही राहणार शिंदोळी अशी खून झालेल्या युवकांची नावे आहेत. केए 19, एबी 6625 क्रमांकाच्या दूध वाहनाचा चालक व त्याच्या आणखी एका साथीदाराने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले असून पोलीस त्या दोघा जणांचा शोध घेत आहेत.
रविवार दि. 25 डिसेंबर रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास शिंदोळी येथील बसरीकट्टी रोडवरील स्मशानासमोर ही घटना घडली आहे. गिरीश व त्याचा मित्र बसवराज हे दोघे ख्रिसमसनिमित्त मित्राच्या घरी जेवणाला गेले होते. रात्रीचे जेवण आटोपून मोटारसायकलवरून क्रिकेट सामना पाहण्यासाठी जाताना समोरून दुधाचे वाहन आले.
दूध वाहनाचा वेग अधिक होता. मोटारसायकलवरून जाणाऱ्या गिरीश व बसवराजच्या अंगावर सदर वाहन आल्यासारखे झाले. त्यामुळे या दोघा जणांनी वाहन जपून चालव, असे दूध वाहनचालकाला ओरडले. वाहनचालक आपले वाहन थांबवून खाली उतरला. यावेळी दोघा जणांमध्ये वादावादी झाली. वादावादीनंतर दूध वाहनातील चाकू काढून चालक व त्याच्या साथीदाराने दोन्ही युवकांना भोसकले.
चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेले गिरीश व बसवराज यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रविवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास बसवराजचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या गिरीशवर आयसीयू विभागात उपचार करण्यात आले. परंतु, उपचारांचा उपयोग न होता मध्यरात्रीनंतर त्याचा मृत्यू झाला.