Tarun Bharat

सरकार, विरोधक आणि कोर्टातही संशयकल्लोळ!

Advertisements

मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर सरकारमधील कल्लोळ कमी होईल असे वाटले होते. मात्र तो वाढत चाललाय. बिहारप्रमाणे महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एक होईल असे वाटत असताना नाना पटोले यांनी वेगळा सुर लावलाय तर न्यायालयात पुढच्या तारखा देण्याचे सत्र सुरू झाले आहे.

महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती अत्यंत गमतीदार झालेली आहे. शिंदे गट आणि भाजपमध्ये सूर जुळता जुळेनात. राणे आणि केसरकर यांच्यात झालेले टोकाचे मतभेद आणि केसरकरांना चालकाची नोकरी देण्यापर्यंत झालेले वक्तव्य, ते विरायच्या आत केसरकर यांना मिळालेले मंत्रीपद आणि राणेंच्या वाटय़ाला आलेले वेटींग, जखमेवर मीठ म्हणजे पर्यटन मंत्रीपद दिले जाण्याची चर्चा म्हणजे सिंधुदुर्ग या राज्यातील एकमेव पर्यटन जिह्यातील निर्णयाचे सर्वाधिकार! ध्वजारोहण केसरकर यांच्या हस्ते होणे या भविष्यात अजून तेढ वाढेल याची चिन्हे दाखवणारे पहिले प्रकरण ठरले. पण, तेवढय़ावर थांबले नाही. मुख्यमंत्र्यांच्या मराठवाडा दौऱयात रावसाहेब दानवे पाटील यांनी अब्दुल सत्तार आता भाजपच्या वळचणीला आले आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांना पैसे मिळालेत असा गौप्यस्फोट करणे असो किंवा दानवेंना उत्तर देताना सत्तार यांनी तुम्हाला यापूर्वी माझ्या मतदारसंघात हजारही मते मिळाली नाहीत आता लाख मते मिळवून देईन असे सांगणे असो, यातून खुन्नस स्पष्ट दिसत आहे. वैशिष्टय़ म्हणजे, हे होत असताना मुख्यमंत्र्यांना शांतपणे ऐकून न ऐकल्यासारखे करावे लागते हे विशेष. मंत्रिमंडळ स्थापनेबाबत झालेल्या दिल्ली वाऱया आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती, मंत्रालयाचे सचिवालय केले अशी झालेली टीका या सगळय़ा पार्श्वभूमीवर अखेर घाईघाईने शपथविधीला परवानगी मिळाली. दोन्ही बाजूच्या मान्यवरांना मंत्रिपदे मिळाली. पण त्यातून वाद अधिक वाढला हेच दिसून आले. भाजपमध्ये पंकजा मुंडे, आशिष शेलार अशा नि÷ावान मंडळींना दूर ठेवले गेले. शेलार, बावनकुळे यांचे पक्षाच्या अध्यक्षपदावर नेमून पुनर्वसन केले की टार्गेट दिले हाही प्रश्नच आहे. मंत्रिमंडळात घेतले त्यांनाही समज देऊन घेण्यात आले अशी चर्चा उठवण्यात आली आहे. शिंदे गटातून जे मंत्री झाले त्यातून चित्रा वाघ यांचा संताप उफाळून आला. ज्या संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आकाश पाताळ एक केले होते त्यांना शपथ घेताना पाहून किंवा ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना मंत्रिमंडळात पाहून विरोध होणार हे निश्चित होते. पूजा चव्हाण प्रकरणी आपली लढाई सुरूच राहील असे चित्रा वाघ यांनी जाहीर केले मात्र त्यांना संजय राठोड यांनी प्रति आव्हान दिले. तर मुख्यमंत्र्यांनी ठाकरे सरकारने संजय राठोड यांना क्लीन चिट दिल्याने या मंत्रिमंडळात घेतल्याचा खुलासा केला. प्रत्यक्षात ठाकरे मंत्रिमंडळात मात्र ही संजय राठोड यांना पुन्हा समाविष्ट करण्यात आले नव्हते या बाबीकडे दुर्लक्ष झाले. इतके दिवस गप्प असलेल्या पंकजा मुंडे यांनी वरि÷ नेत्यांना मी पात्र असल्याचे वाटत नसेल असे म्हणून आपली नाराजी व्यक्त केली. त्याचे परिणाम भविष्यात काय होतील हे दिसून येईलच. केवळ भाजपमधूनच खदखद व्यक्त झाली नाही तर मंत्रिमंडळ विस्ताराच्या पूर्वसंध्येला झालेल्या बैठकीतून संतापाने बाहेर पडलेल्या संजय शिरसाट यांच्या रूपाने शिंदे गटातील पहिली खदखद व्यक्त झाली. अद्याप इतरांनीही मनावर झाडी आणि डोंगर ठेवले आहेत. त्यातील चौकशी सुरू नाहीत ते भविष्यात आक्रमक होऊ शकतात. अपक्षांचे नेते बच्चू कडू यांनी तर गद्दारीवरून सुरुवात करून जो सगळय़ात शेवटी आला त्याला सगळय़ात आधी मंत्रीपद मिळाले असा राग व्यक्त केला आहे. त्यांच्या बोलण्यातून त्यांची खदखद दिसून येत होती. त्यामुळेच कदाचित अडीच वर्षांने विस्तार होईल असे सांगून चलबिचल निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे. मंत्रिमंडळात 50 बंडोबा, त्यातले किती थंडोबा होणार? हा गुंता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोडवायचा आहे आणि त्या गुंत्यात सरकारचा पाय अडकू नये याचीही काळजी घ्यायची आहे

 विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे अंबादास दानवे यांची निवड झाल्याने काँग्रेस नाराज आहे. महाविकास आघाडी एकत्र असताना आणि उपसभापतीपद सेनेकडे असताना विरोधी पक्ष नेते पद काँग्रेसला मिळायला हवे होते, मात्र चर्चा न करता शिवसेनेने आपला निर्णय घेतला, आपला अजूनही या पदावर दावा आहे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले. अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यानीही त्यांना साथ दिली. त्यांची मागणी रास्त असून शिवसेनेने चर्चा करायला हवी होती अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करून संतुलन साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कितपत यशस्वी होईल याबाबत शंका आहे. हे सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या चार ज्ये÷ नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. एकादृष्टीने राष्ट्रवादीने ठाकरे यांना अडचणीच्या काळात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पवारांनी चिन्हाबाबत सेनेची बाजू घेऊन बंडखोरावर टीका केली आहे. मात्र त्याच वेळी अजितदादांच्या मनात नेमकं काय चाललंय याबाबतही चर्चा सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला त्यांची हजेरी, धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणे याचे संदर्भ 2019 मध्ये अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीने भाजपशी जोडून घ्यावे या मागणीशी जोडले जात आहेत. त्यावेळेचे दादांचे बंड पवारांनी मोडून काढले होते. यावेळी दादा पक्षावर मांड ठोकायचा प्रयत्न करत आहेत का? हा प्रश्न आहे. आता विरोधी सर्वांची नजर आहे ती, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर. पण पुढच्या तारखा मिळत असल्याने विरोधक अस्वस्थ आहेत. सरन्यायाधीश रामण्णा यांनी निवृत्तीपूर्वी निकाल द्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे तारखा का पडत आहेत? ही त्यांची शंका असली तरी निकाल कायद्यानुसार लागतो, त्याचा योग्य अर्थ न्यायालयात ठसवणे ही त्यातील महत्वाची बाब आहे, याकडे दुर्लक्ष होऊ नये.

शिवराज काटकर

Related Stories

गवारेडय़ांच्या वाढत्या हत्या

Patil_p

संत सोहिरोबानाथ आंबिये जन्मस्थळ तीर्थक्षेत्र बनावे

Patil_p

भीमकीया देखिलें लक्ष्मीसी

Patil_p

ऑक्टोबर हिटमध्ये ‘ग्रीष्मा’चा तडाखा

Amit Kulkarni

मराठी पाऊल पडते कुठे

Patil_p

कुठे गेले मदतसाहित्याचे शेकडो ट्रक ?

Patil_p
error: Content is protected !!