काणकोण पोलिसांना निवेदन : तपास करण्याची मागणी
प्रतिनिधी /काणकोण
नुवे, श्रीस्थळ येथील चंद्रशेखर चंद्रकांत वेळीप या युवकाचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असल्याचा अहवाल शवचिकित्सेनंतर आला असला, तरी हा घातपाताचा प्रकार असण्याचा संशय मयत युवकाचे चुलते अशोक कुष्टा वेळीप आणि नुवेचे पंच राजेश वेळीप यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास करावा असे लेखी निवेदन अशोक कुष्टा वेळीप यांनी दिले आहे.
यावेळी पंच राजेश वेळीप, दशरथ वेळीप, खोतीगावचे पंच प्रशांत वेळीप, सागर वेळीप, अशोक वेळीप, विघ्नेश भगत, कृष्णा वेळीप, जेस फर्नाडिस, प्रदीप पागी, विकास भगत आणि अन्य उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या श्रीस्थळ पंचायतीच्या ग्रामसभेत या प्रकरणी चर्चा होऊन पोलिसांनी योग्य रीतीने तपास करावा अशी मागणी झाली असल्याचे वेळीप यांनी स्पष्ट केले. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर आणि गृहमंत्र्यांच्या कार्यालयात देण्यात आल्या आहेत. मयत चंद्रशेखर वेळीप हा युवक उत्तमपैकी पोहोणारा होता. ज्या ठिकाणी त्याचा मृतदेह आढळला त्या ठिकाणी बुडण्याएवढे पाणी नाही. त्याच्या अंगावरील कपडे गायब झाले होते. ज्या स्कूटरने तो आला होता त्याच्या किल्ल्या स्कूटरच्या डिकीत आढळल्या होत्या. फ्लिपकार्ट कंपनीत तो कामाला होता. त्याच्या मोबाईल फोनची दोन सिमकार्डे असून त्यांच्या आधारे तपास करून यामागे जे कोणी असतील त्यांचा छडा लावावा, अशी मागणी वेळीप यांनी केली आहे. तपासाला उशीर झाल्यास महत्त्वाचे धागेदोर नष्ट होण्याची भीती वाडय़ावरील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. मयत युवकाचे आई-वडील अजूनही शोकसागरात असल्यामुळे कुटुंबातील कर्ता पुरुष या नात्याने आपल्यावर जबाबदारी असल्याचे अशोक वेळीप यांनी स्पष्ट केले.