Tarun Bharat

कोल्हापूरकरांशी डॉ. आंबेडकरांचा जिव्हाळा!

राजर्षी शाहू महाराजांपासून नाते : करवीर संस्थानची मदत : घटनाकारांचा हयातीतील पहिला पुतळाही ऐतिहासिक बिंदू चौकात : 1957 मध्ये एस. के. डिगेंच्या रूपाने खासदारही दिला

संजीव खाडे/कोल्हापूर

लोकराजा राजर्षी शाहू महाराज अणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याती नाते सर्वश्रृत आहे. शाहूकाळात निर्माण झालेले नाते डॉ. आंबेडकरांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपले आणि कोल्हापूकरांनी आजही ते नाते जपून ठेवले आहे. आज आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने या अतुट नात्यावर प्रकाश टाकताना जिव्हाळाही अधोरेखित होतो.
डॉ. आंबेडकर परदेशात शिक्षणासाठी गेले होते, तेंव्हा त्यांना निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीत करवीरचे अधिपती राजर्षी शाहू महाराज आणि बडोद्याचे अधिपती सयाजीराव गायकवाड यांनी केवळ मदत केली नाही तर मानसिक पाठबळही दिले. राजर्षी शाहू महाराजांनी डॉ. आंबेडकर हे भविष्यात देशातील दलितांचे, बहुजनांचे नेतृत्व करतील, असे माणगाव परिषदेत शंभर वर्षांपूर्वी भाकीत केले होते. ते डॉ. आंबेडकरांनी खरे ठरविले. शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराजांच्या काळातही करवीरचे छत्रपती घराणे आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील नाते कायम राहिले. भारतीय राज्य घटना तयार करण्यासाठी आपल्या आयुष्यात अमूल्य योगदान देताना डॉ. आंबेडकरांनी आपली विव्दत्ता पणाला लावली. देशातील प्रत्येकाला न्याय देणारी राज्यघटना बनवत असताना त्यांनी राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या कायद्यांचाही आधार घेतला. शाहूकालीन नाते, जिव्हाळय़ामुळे कोल्हापूरकरांचे डॉ. आंबेडकरांशी नाते जुळले होते. दत्तोबा दळवींचे घराणे, स्टेट फोटोग्राफर पाटील यांचे घराणे असो वा बहुजन चळवळीतील भाई माधवराव बागल, वसंतराव बागल असोत त्यांच्या बरोबरीने दलित चळवळीतील बँरिस्टर तात्यासाहेब माने, शाहूभक्त गंगाराम कांबळे, शिर्के, जाधव, ढाले या घराण्यांनी डॉ. आंबेडकरांशी शेवटपर्यंत स्नेह ठेवला. डॉ. आंबेडकर जेंव्हा कोल्हापुरात येत. तेंव्हा ते या घराण्यांसह कार्यकर्त्यांची घरी जात, त्यांच्याशी संवाद साधत. त्यांच्या आठवणी अनेक कार्यकर्त्यांनी शब्दबद्ध करून ठेवल्या आहेत.

हयातीत बसविला पुतळा आणि खासदारही दिला
शाहू महाराजांनी डॉ. आंबेडकरांची कोल्हापुरात मिरवणूक काढून सत्कार केला होता. माणगाव परिषदेत भाकीत केले होते. शाहू महाराजांनंतर राजाराम महाराजांनी स्नेह जपला. डॉ. आंबेडकरांना ते मामा म्हणत असत. हे नाते स्वातंत्र्योत्तर काळातही आणि आजही कायम राहिले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्य घटना देशातील नागरिकांनी स्वीकारली. त्या काळात 9 डिसेंबर 1950 मध्ये रोजी करवीरच्या जनतेने डॉ. आंबेडकरांच्या हयातीत त्यांचा देशातील पहिला पुतळा उभारून भारतीय राज्य घटनेच्या शिल्पकाराचा सन्मान केला होता. बहुजन समाजाचे नेते, विचारवंत डॉ. भाई माधवराव बागल यांच्या हस्ते बिंदू चौकात झाले होते. या ठिकाणचे महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. आंबेडकर यांचे पुतळे आजही प्रेरणा देत उभे आहेत. भारतीय नागरिकांना राज्य घटनेच्या माध्यमातून अधिकार, हक्क देणाऱया डॉ. आंबेडकरांच्या शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशन पक्षाचा खासदार 1957 मध्ये कोल्हापूरकरांनी निवडून दिला होता. लोकसभेच्या 1957 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत एस. के. तथा शंकरराव खंडेराव डिगे हे कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून भारतात सर्वाधिक मते घेऊन निवडून आले होते. डिगे यांना 2 लाख 69 हजार 605 इतकी मते मिळाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी के. एल. मोरे यांना 1 लाख 26 हजार 544 मते मिळाली होती. डिगे यांना लोकसभेत पाठविताना कोल्हापूरकरांनी डॉ. आंबेडकरांवरील विश्वास, जिव्हाळा आणि प्रेम व्यक्त केले होते. लंडनमध्ये आंबेडकर ज्या निवासात राहत असत, ते निवासस्थान विकत घेऊन भारत सरकारने त्या ठिकाणी स्मारक केले आहे. या स्मारकातही डॉ. आंबेडकर खुचीवर बसलेला दुर्मीळ, ऐतिहासिक फोटो आहे, तो देखील कोल्हापुरातील तत्कालिन स्टेट फोटोग्राफर पाटील यांनी काढला होता. संस्थानचे चित्रकार दत्तोबा दळवी यांच्याबरोबर डॉ. आंबेडकरांचा छत्रपती घराण्याकडून मदत मिळण्यासंदर्भातील पत्रव्यवहारही ऐतिहासिक दस्ताऐवज आहे. डॉ. आंबेडकरांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर आणि छत्रपती घराण्याचे वारस खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्यातील दृढ नातेही आजही कायम आहे.

बिंदू चौकात संसदेची प्रतिकृती
डॉ. आंबेडकरांचे अनुयायी माजी खासदार एस. के. डिगे यांचे सुपुत्र सदानंद डिगे गेली 31 वर्षे डिगे फौंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक कार्यात आहेत. दरवर्षी ते आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी करतात. यंदा त्यांनी बिंदू चौकात संसद भवनाची प्रतिकृती उभारली आहे. डॉ. आंबेडकरांनी दिलेली राज्य घटना सर्वश्रेष्ठ आहे. त्यावरच संसद आणि देश चालतो. संसदेची प्रतिकृती साकारताना डिगे यांनी दाखविलेली कल्पकता शहरात आकर्षण आणि चर्चेचा विषय ठरली आहे.

Related Stories

Vedanta & Foxconn :”मोदी ने क्या दिया? लॉलीपॉप लॉलीपॉप” म्हणत पुण्यात, मुंबईसह कोल्हापुरात विरोधकांकडून आंदोलन

Archana Banage

कोल्हापूर : कर्जाचा विनियोग चांगल्या प्रकारे करा : संजय श्रीवास्तव

Archana Banage

Kolhapur : शिष्यवृत्तीत महापालिका शाळा राज्यात अव्वल, पहिल्याच दिवशी प्रवेश फुल्लचे बोर्ड

Archana Banage

ऑरेंज झोनमधील सवलतीसंदर्भात उद्या बैठक

Archana Banage

नवनिर्वाचित सरपंचाची आयडिया येईल अंगलट

Abhijeet Khandekar

Kolhapur: सीईओ चव्हाण यांची संभाव्य पुरबाधीत गावांना भेट

Abhijeet Khandekar