प्रतिनिधी /बेळगाव
शिक्षण, आरोग्य, कृषी, सहकार अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे केएलई संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांचा अमृतमहोत्सवी सोहळा 15 ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रीडांगणावर दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या सोहळय़ाला कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा येथील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी दिली.
सोहळय़ाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, एकाच आयुष्यामध्ये 1 क्यक्ती किती प्रकारचे कार्य करू शकते याचे उदाहरण म्हणजे डॉ. प्रभाकर कोरे होय. केएलईची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांनी 293 शिक्षण संस्था उभ्या केल्या. त्यातून 1 लाख 38 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ऑगस्टमध्ये त्यांचा वाढदिवस असून ऑगस्ट 2021 ते ऑगस्ट 2022 या वर्षभरात शिक्षण, आरोग्य, कृषी, सहकार या क्षेत्रात अनेक चर्चासत्रे, संशोधन, प्रबंध लेखन, निरंतर शिक्षण कार्यक्रम सुरू आहे.
जानेवारी महिन्यात चिदानंद कोरे साखर कारखान्याच्या आवारात कृषी मेळावा घेण्यात येणार असून त्यावेळी गृहमंत्री अमित शहा यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. तसेच नोव्हेंबरमध्ये नागनूर मठाचे सिद्धराम महास्वामी यांच्या पुढाकाराने राज्यातील मठाधीशांचे संमेलन घेऊन ‘राष्ट्र उभारणीत मठाधीशांचे योगदान’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे.
शनिवारी होणाऱया अमृतमहोत्सवी सोहळय़ास मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे, केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी, राज्याचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, अखिल भारतीय वीरशैव महासभेचे अध्यक्ष डॉ. शामनूर शिवशंकराप्पा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील उपस्थित राहणार आहेत. जिह्यातील विविध ठिकाणांहून येणाऱया सर्वांसाठी वेगवेगळय़ा ठिकाणी भोजनाची सोय करण्यात आल्याचे कवटगीमठ यांनी सांगितले. याप्रसंगी खासदार इराण्णा कडाडी, कित्तूरचे आमदार महांतेश दोड्डगौडर, केएलईचे महांतेश कौजलगी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.