पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून, पुढील महिनाभर ते पुण्यातच उपचार घेणार आहेत. प्रकाश आमटे यांचे पुत्र अनिकेत आमटे यांनी फेसबुक पोस्टद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.
13 जून रोजी डॉ. आमटे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभासाठी आले असता त्यांना ताप आणि खोकला अशी लक्षणे आढळली. त्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. न्यूमोनियावर उपचार सुरु असताना केलेल्या काही चाचण्यांमधून डॉ. आमटे यांना प्राथमिक अवस्थेतील रक्ताचा कर्करोग (ल्यूकेमिया) असल्याचे निष्पन्न झाले. तीन दिवसांच्या उपचारानंतर डॉ. आमटे यांना घरी सोडण्यात आले असून, पुढील उपचार कसे असतील यासंदर्भातील माहिती अनिकेत यांनी डॉ. आमटेंच्या फेसबुक पेजवरुनच दिली आहे.
बाबांची तब्येत बरी आहे. सध्या डिस्चार्ज मिळाला आहे. दोन-तीन दिवसांनी पुन्हा तपासणी होईल. परत रक्ताच्या सर्व तपासण्या करतील आणि ब्लड व्हॅल्यूज ठीक असल्यास लवकरच (आठ ते दहा दिवसांत) केमोथेरपी सुरू करतील. पुढील महिनाभर पुण्यातच ट्रीटमेंट होणार आहे. बाबांचा आजचा फोटो सोबत जोडला आहे रुमानी सोबतचा. पेशंट कसा असावा, याचे आयडीयल उदाहरण आहेत बाबा. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अतिशय आपुलकीने ट्रीटमेंट करणारे डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, मामा, मावश्या सर्वांचे आभार, असेही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.