मुलाखतीनंतर निवड समितीकडून अधिष्ठाता पदाच्या निवडी जाहीर
प्रतिनिधी/कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठातील विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठातापदी डॉ. आर. के. कामत आणि वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अधिष्ठातापदी डॉ. एस. एस. महाजन यांची निवड करण्यात आली. मंगळवारी या दोन्ही पदासाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. या निवडीबद्दल त्यांचे शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान आणि वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखांसाठी पूर्णवेळ अधिष्ठाता पदांसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी घेण्यात आल्या. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या मुलाखतींसाठी पात्र आठ उमेदवारांपैकी सहा उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित होते. तर वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या मुलाखतीसाठी पात्र चारही उमेदवार उपस्थित होते. या मुलाखती झाल्यानंतर निवड समितीने दोन्ही अधिशाखांच्या उमेदवारांची निवड जाहीर केली. त्यामुळे विद्यापीठातील अधिष्ठाता पदाचा मार्ग रिकामा झाला आहे. दोन्ही उमेदवार राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक कामात अग्रेसर आहेत.
डॉ. आर. के. कामत यांचा परिचय
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठातापदी निवड झालेले डॉ. आर. के. कामत मूळचे कागल येथील आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक शास्त्र अधिविभागांचे ते अधिविभागप्रमुख आहेत. देशविदेशांतील नामांकित जर्नल्समध्ये त्यांचे 200 हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी 16 पुस्तके लिहिली आहेत. आतापर्यंत 18 विद्यार्थ्यांना त्यांनी पीएच. डी.साठी मार्गदर्शन केले आहे. शिवाजी विद्यापीठात भारत सरकारच्या निधीतून सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक म्हणून काम करताना नॅक (बंगळूर) यांच्याकडून विद्यापीठाला ‘एप्लसप्लस’ मानांकन मिळवण्यातही त्यांचे महत्वाचे योगदान आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांना 10 कोटी रुपयांचे संशोधन प्रकल्प मंजूर झाले आहेत. यामध्ये युरोपियन युनियनकडून मंजूर प्रकल्पाचाही समावेश आहे. त्यांनी युरोप आणि दक्षिण पूर्व आशियातील अनेक देशांना संशोधनाच्या निमित्ताने भेटी दिल्या आहेत. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने त्यांना यंग सायंटिस्ट पुरस्काराने सन्मानित केले आहे. विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद, अधिसभा सदस्य आहेत. इतर अनेक संस्थांचे विद्यापीठ अनुदान आयोग नामांकित सदस्य आहेत. त्यांनी महाराष्ट्रात परीक्षा सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी राजेश अग्रवाल समितीवर तसेच महाराष्ट्र सरकारच्या राज्य गुणवत्ता परिषदेवरही काम केले आहे.
डॉ. एस. एस. महाजन यांचा परिचय
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे नूतन अधिष्ठाता डॉ. एस. एस. महाजन शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे अधिविभाग प्रमुख आहेत. गेली 27 वर्षे ते शिक्षक, संशोधक व शैक्षणिक प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करीत आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई यांच्या संशोधन परीक्षण समित्यांसह पुणे विद्यापीठ व मुंबईच्या होमी भाभा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून काम केले आहे. डॉ. महाजन यांचे 48 शोधनिबंध जर्नल्समधून प्रकाशित झाले आहेत. विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमधून त्यांनी 68 शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 15 विद्यार्थ्यांनी पीएच. डी. तर 13 जणांनी एम. फील. पूर्ण केली आहे. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या तीन लघु आणि युजीसी, आयसीएसएएसआर आणि इम्प्रेस यांच्या तीन मोठय़ा संशोधन प्रकल्पांवर काम केले आहे. विद्यापीठाच्या प्रभारी अधिष्ठाता पदासह त्यांनी विद्यापरिषद सदस्य, अधिसभा सदस्य आणि अभ्यास मंडळ अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. इंडो-जर्मन एज्युकेशन समीट- मुंबई-2016, ग्लोबल एज्युकेशन समीट, बंगलोर 2017 या परिषदांसह शिवाजी विद्यापीठातर्फेही त्यांना उत्कृष्ट शिक्षक व संशोधक पुरस्कारांनी गौरविले आहे.