जी. सतीश रेड्डी आता संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
डीआरडीओचे विद्यमान अध्यक्ष जी. सतीश रेड्डी यांना संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या बदलीमुळे डॉ. समीर व्यंकटपती कामत यांची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. समीर कामत यांनी 2017 मध्ये डीआरडीओमध्ये नौदल प्रणालीमध्ये महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला होता. तत्पूर्वी 1989 मध्ये त्यांनी डीआरडीओमध्ये वैज्ञानिक ‘सी’ पदावर कार्यभार सुरू केला होता. 1985 मध्ये त्यांनी आयआयटी खरगपूरमधून मेटलर्जिकल इंजिनिअरिंगमधून बी. टेक (ऑनर्स) पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तसेच 1988 मध्ये त्यांनी अमेरिकेतील ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीमधून साहित्य विज्ञान आणि इंजिनिअरिंगमधून डॉक्टरेटचे शिक्षण घेतले.
मागील 25 वर्षांमध्ये डॉ. कामत यांनी सूक्ष्म प्रबलित धातू मॅट्रिक्स कंपोजिट्स, सिरेमिक मॅट्रिक्स कंपोझिट्स, ऍल्युमिनियम-लिथियम मिश्र धातू, उच्च शक्ती ऍल्युमिनियम मिश्र धातू आणि टायटॅनियम मिश्र धातू यासारख्या प्रगत सामग्रीमध्ये मायक्रोस्ट्रक्चर-मेकॅनिकल प्रॉपर्टी कॉरिलेशनच्या क्षेत्रात डॉ. कामत यांनी काम केले आहे. ज्यामुळे विविध संरक्षण अनुप्रयोगांसाठी विकास झाला आहे. डीआरडीओ आणि संशोधनामधील योगदानामुळे डॉ. कामत यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 2009 मध्ये त्यांना ‘नॅशनल सायन्स डे ओरेशन सिलिकॉन’ पदक मिळाले. 2012 मध्ये ‘डीआरडीओ सायंटिस्ट ऑफ द ईयर’ पुरस्कार मिळाला होता.