18 पासून ग्रंथ प्रदर्शन : इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझातर्फे पणजीत भरगच्च कार्यक्रमांचा सप्ताह
प्रतिनिधी / पणजी
इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा या गोव्यातील प्राचिन संस्थेतर्फे वार्षिक स्थापनादिन सप्ताहानिमित्त येत्या दि 18 नोव्हेंबरपासून ग्रंथ सप्ताह तसेच दोन दिवसीय भरगच्च नाटय़संगीत समारोह, दशावतारी नाटय़प्रयोग ‘ओरबिन’ या गोमंतकीय कारंबरीवर चर्चासत्र, बहुभाषिक कवी संमेलन तसेच संस्थेच्या पुस्तिकेचे प्रकाशन आणि यानिमित्त सात दिवस ग्रंथ प्रदर्शन इत्यादी भरगच्च कार्यक्रमांचे पणजीत आयोजन केले आहे.
इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेचे अध्यक्ष दशरथ परब तसेच सदस्य सचिव अशोक परब यांनी संपूर्ण सप्ताहाभरच्या भरगच्च कार्यक्रमांची घोषणा एका पत्रकार परिषदेत केली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. 18 रोजी ते दि. 24 रोजीदरम्यान इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या स्थापनादिनानिमित्त राष्ट्रीय पुस्तक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 18 रोजी सायं. 4 वा. पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब यांच्याहस्ते होणार आहे. या प्रदर्शनात सुमारे 10 ते 15 पुस्तक विक्रेते व प्रकाशक सहभागी होणार आहेत. याशिवाय पोट्रेट पेटिंग कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार संजय हरमलकर यांच्याहस्ते होणार आहे. ही कार्यशाळा सात दिवस चालणार आहे.
रसिकांना मिळणार नाटय़संगीताची मेजवानी
शनिवार दि. 19 रोजी व रविवार दि. 20 रोजी दुपारी 3.30 वा. नाटय़संगीतावर आधारित ‘संगीत नाटकाचा इतिहास आणि नाटय़गीते’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात पुणे येथील पं. विजय कोपरकर, प्रविण शिलकर, दत्तु गावस, अनुष्का थळी, ऋषिकेश ढवळीकर, उर्वी फडके, मंदार केळकर, सिद्धी मळीक आदींचा यात सहभाग आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद भगत आणि सिद्धी उपाध्ये करतील. कलाकारांना प्रदीप शिलकर, दत्तराज सुर्लकर, दयानिधेश कोसंबे, रोहिदास परब साथसंगत करतील.
सोमवार दि. 21 रोजी सायं. 4 वा. पासून गोमंतकीय कवी कवयित्रीतर्फे काव्यवाचन कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पांडुरंग गावकर भूषवतील. या कार्यक्रमात पांडुरंग गावकर, दयाराम पाडलोस्कर, गौतमी चोर्लेकर, प्रियंका नाईक, पौर्णिमा केरकर, शोभा फुलकर, ऍड. सालेस्ता, ग्वडालोप डायस, डॉ. हनुमंत चोपडेकर, सुनिता फडणीस, सारिका अडविलकर, डॉ. सोनिया सिरसाट, स्मिता भंडारी, अपूर्वा ग्रामोपाध्ये, शिल्पा परब, मानसी धाऊस्कर यांचा सहभाग आहे. मंगळवार दि. 22 रोजी सायं. 4 वा.पासून प्रो. गजानन देसाई लिखित ओरेबिन या पुस्तकावर चर्चात्मक कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात डॉ. सोमनाथ कोमरपंत, प्रो. नारायण महाले आणि सुरेश वाळवे यांचा सहभाग असेल.
बुधवार दि. 23 रोजी दुपारी 3.30 वा.पासून कला वैभव दशावतारी नाटय़मंडळ गुळेली, मोर्ले सत्तरी संघातर्फे दशावतारी नाटक सादर होईल. गुरूवार दि. 24 रोजी सायं. 4 वा.पासून इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझाचा स्थापनादिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी वाचन संस्कृती या विषयावर साहित्यिक कृष्णाजी कुलकर्णी यांचे व्याख्यान होईल. त्यानंतर इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझाची पुस्तिकाचे प्रकाशन करण्यात येईल अशी माहिती अशोक परब यांनी यावेळी दिली.