हृषिकेश ढवळीकर मुख्य आकर्षण
प्रतिनिधी/ पणजी
इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेमध्ये शनिवारी सुरू झालेल्या नाटय़संगीत महोत्सवात एकापेक्षा एक बहारदार गाण्यांनी रसिक प्रेक्षक बेहद्द खूष झाले. आज गोमंतकातील बालकलाकार व असंख्य बक्षिसांचा मानकरी हृषिकेश ढवळीकर यांचे गायन हे महोत्सवात आणखी एक आकर्षण ठरणार आहे.
इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझाच्या वार्षिक पुस्तक सप्ताहाचा भाग म्हणून शुक्रवारपासून विविध कार्यक्रमांना प्रारंभ झाला. त्यातच रंगभूमी दिनाच्या कार्यक्रमाचाही समावेश होता. यानिमित्त शनिवारी प्रख्यात गायक पं. विजय कोपरकर यांनी एकापेक्षा एक सादर केलेल्या बहारदार गायनाने कार्यक्रमाला रंगत आली. याशिवाय अनुष्का थळी, दत्तू गावस, लक्ष्मी महात्मे, प्रवीण शिलकर, मंदार केळकर, सिद्धी मळीक यांनी बहारदार सवेश नाटय़गीते सादर केली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पं. विजय कोपरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दशरथ परब तर प्रख्यात तबलावादक मास्तर पुंडलिक कळंगूटकर तसेच सदस्य सचिव अशोक परब, सागर जावडेकर, कालिका बापट, डॉ. आशा गेहलोत यांची उपस्थिती होती. यावेळी मास्तर कळंगूटकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
हे सूरानो चंद्र व्हा ! या सिद्धी मळीक यांच्या नाटय़गीताला रसिकांनी जोरदार टाळय़ा वाजवून उत्स्फूर्त दाद दिली. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रनिवेदन प्रा. गोविंदराव भगत यांनी केले. रोहिदास परब (तबला), प्रा. दत्तराज सुर्लकर (ऑर्गन) यांनी साथसंगत केली.
आज या महोत्सवातील दुसरा भाग सादर करण्यात येईल व त्यात अलीकडेच बिल्वदल व लोकमान्यच्या सवेश नाटय़गीत गायन स्पर्धेचा प्रथम क्रमांक विजेता हृषिकेश ढवळीकर हा बालकलाकार नाटय़गीते सादर करणार आहे. याशिवाय अनुष्का थळी, मंदार केळकर, सिद्धी मळीक, दत्तू गावस आणि प्रवीण शिलकर हे कलाकार सहभागी होतील. त्याचबरोबर प्रख्यात गायक कलाकार पं. विजय कोपरकर हे नाटय़गीते सादर करतील. हा कार्यक्रम आज पणजीत इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात दुपारी 3.30 वा. होईल. सिद्धी उपाध्ये कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन करतील, तर प्रदीप शिलकर ऑर्गन तर दयानिधेश कोसंबे हे तबल्यावर साथसंगत करणार आहेत.