राजस्थान रॉयल्सचा 29 धावांनी नाटय़मय विजय
सुकृत मोकाशी / पुणे
रियान परागचे सामन्याला कलाटणी देणारे झंझावाती अर्धशतक आणि कुलदीप सेन-अश्विन यांच्या एकत्रित 7 बळीच्या पराक्रमामुळे राजस्थान रॉयल्सने आयपीएल साखळी सामन्यात आरसीबीचा 29 धावांनी धुव्वा उडवला. लो स्कोअरिंग थ्रिलर ठरलेल्या या लढतीत राजस्थान रॉयल्सला 20 षटकात 8 बाद 144 धावांवर समाधान मानावे लागले होते. पण, प्रत्युत्तरात आरसीबीचा डाव 19.3 षटकात सर्वबाद 115 धावांवरच आटोपला आणि राजस्थानने नाटय़मय विजयावर शिक्कामोर्तब केले.
रियान परागने (31 चेंडूत नाबाद 56) शानदार अर्धशतकाच्या बळावर राजस्थानला 144 धावांपर्यंत मजल मारुन दिली आणि त्याच्या याच धावा महत्त्वाच्या ठरल्या. परागसाठी आयपीएलमधील ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. त्याने 3 चौकार व 4 षटकार फटकावले. परागने हर्षल पटेलच्या शेवटच्या षटकात 1 चौकार व 2 षटकारांची आतषबाजी केली.
राजस्थानला माफक धावसंख्येत रोखल्याने आरसीबीला दिलासा लाभला. पण, प्रत्यक्षात त्यांना 145 धावांचे माफक आव्हानही सर करता आले नाही. कुलदीप सेन (4-20), रविचंद्रन अश्विन (3-17), प्रसिद्ध कृष्णा (2-23) यांनी आरसीबीला 19.3 षटकात 115 धावांवरच गारद केले.
राजस्थान रॉयल्सचे आघाडीचे 3 फलंदाज पॉवर प्ले षटकातच गारद झाल्यानंतर ते एकाही टप्प्यावर हुकूमत दाखवू शकले नाहीत. आरसीबीतर्फे सिराज (2-30), हॅझलवूड (2-19) व हसरंगा (2-23) यांनी प्रत्येकी 2 बळी घेत राजस्थानच्या प्रयत्नांवर सातत्याने मर्यादा राखल्या.
आरसीबीने नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थानला प्रथम फलंदाजीला पाचारण केले आणि ठरावीक अंतराने गडी बाद होत राहिल्याने हा निर्णय योग्यच ठरला. राजस्थानच्या फलंदाजांना मोठी भागीदारी करु दिली नाही, हे आरसीबीच्या गोलंदाजांचे मोठे यश ठरले. देवदत्त पडिक्कल (7) व जोस बटलर (8) हे दोन्ही फलंदाज स्वस्तात बाद झाले तर रविचंद्रन अश्विनला (17) बढतीवर पाठवण्याचा निर्णयही राजस्थानवरच उलटला.
सिराजने लागोपाठ दोन षटकात पडिक्कल व अश्विन यांना बाद केले तर हॅझलवूडने बटलरची महत्त्वाची विकेट घेतली. मिडऑनवर तैनात सिराजने जमिनीपासून अगदी काही इंचांवर अप्रतिम झेल टिपला. संजू सॅमसन (21 चेंडूत 27) व डॅरेल मिशेल (16) यांनी पाचव्या गडय़ासाठी 35 धावा केल्या. नंतर हसरंगाने सॅमसनचा त्रिफळा उडवत ही जोडी फोडली.
राजस्थानचे सलामीवीर या सामन्यात काही चमक दाखवू शकले नाहीत. धावसंख्या 11 असताना पडिक्कल सिराजचा शिकार ठरला. त्याला केवळ सात धावा करता आल्या. यानंतर अश्विनला तीन नंबरवर बढती मिळाली. त्याला 17 धावा करता आल्या. तो बाद झाला, त्यावेळी राजस्थानच्या 33 धावा झाल्या होत्या. त्याचाही सिराजने स्वतःच्या गोलंदाजीवर झेल घेतला. राजस्थानच्या 33 धावा झाल्या असताना बटलरच्या रूपाने राजस्थानला मोठा धक्का बसला. त्याला केवळ 8 धावा करता आल्या. त्याला सिराज करवी हॅझलवूडने बाद केले. सिराजने त्याचा अप्रतिम झेल टिपला. यावेळी राजस्थानची 3 बाद 33 अशी अवस्था झाली होती. राजस्थानला पॉवरप्लेच्या सहा षटकात 43 धावा करता आल्या.
यानंतर कर्णधार सॅमसन आणि मिशेल डाव सावरत असतानाच 69 धावांवर सॅमसन 27 धावा काढून बाद झाला. त्याला हसरंगाने त्रिफळाचीत केले. यावेळी राजस्थानच्या 10 षटकात 4 बाद 69 धावा झाल्या होत्या. धावसंख्या 99 असताना मिशेलही 16 धावावर माघारी परतला. त्याला हॅझलवूडने मॅक्सवेलकरवी झेलबाद केले. यानंतर आलेल्या हेतमेयरलाही फारशी चमक दाखवता आली नाही. त्याला हसरंगाने 3 धावांवर प्रभुदेसाईकरवी झेलबाद केले. त्यानंतर बोल्ट लगेच परतला. हर्षल पटेलने त्याला कोहलीकरवी झेलबाद केले. प्रसिद्ध कृष्णाला प्रभुदेसाईने धावबाद केले. रियान परागने शेवटच्या दोन षटकात फटकेबाजी केल्याने राजस्थानला 20 षटकात 8 बाद 144 धावा करता आल्या. या लढतीत आरसीबीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स ः 20 षटकात 8 बाद 144 (रियान पराग 31 चेंडूत 3 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 56, संजू सॅमसन 21 चेंडूत 27, रविचंद्रन अश्विन 9 चेंडूत 17, डॅरेल मिशेल 24 चेंडूत 16. अवांतर 3. जोश हॅझलवूड 4 षटकात 2-19, वणिंदू हसरंगा 4 षटकात 2-23, सिराज 4 षटकात 2-30).
आरसीबी ः 19.3 षटकात सर्वबाद 115 (फॅफ डय़ू प्लेसिस 21 चेंडूत 23, वणिंदू हसरंगा 13 चेंडूत 18, शाहबाज अहमद 27 चेंडूत 17, रजत पाटीदार 16 चेंडूत 16. अवांतर 11. कुलदीप सेन 3.3 षटकात 4-20, रविचंद्रन अश्विन 4 षटकात 3-17, प्रसिद्ध कृष्णा 2-23).