Tarun Bharat

द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित

राष्ट्रपतीपदासाठी मतदान पूर्ण ः 21 जुलै रोजी मतमोजणी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पंधराव्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठीचे मतदान सोमवारी सायंकाळी 5 वाजता संपले. देशभरातील खासदार आणि आमदार यात सहभागी झाले होते. सोमवारी झालेल्या मतदानाअंती द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. गुरुवार, 21 जुलै रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार असून मुर्मू विजयी झाल्यास देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावर विराजमान होण्याची संधी एका आदिवासी महिलेला मिळणार आहे. त्यांना 27 हून अधिक पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. रालोआतील घटकपक्षांबरोबरच अनेक विरोधी पक्षांनी त्यांना साथ दिली आहे. विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना 14 पक्षांचा पाठिंबा मिळाला.

राष्ट्रपती निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा हे उमेदवार आहेत. यांच्या निवडीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी आणि अनेक दिग्गज नेत्यांनी  राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनात पोहोचून मतदान केले. त्यांनी आपला फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंगही व्हीलचेअरवरून मतदानासाठी आले होते. ते सध्या 89 वर्षांचे असून विविध आजारांचा सामना करत आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी संसद भवनात मतदान केले. मथुरेच्या भाजप खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी संसदेत मतदान करण्यासाठी पोहोचल्या होत्या. याशिवाय राष्ट्रपतीपदाचे विरोधी गटाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचे पुत्र भाजप खासदार जयंत सिन्हा यांनीही मतदान केले. त्यांनी वडिलांऐवजी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करणार असल्याचे जाहीर केले होते. बिहारमधील सीतामढीचे आमदार मिथिलेश कुमार विधानसभेत मतदान करण्यासाठी स्ट्रेचरवर पोहोचले. मिथिलेश कुमार यांची प्रकृती खराब आहे.

मुख्यमंत्र्यांनी बजावला हक्क

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश विधानसभेत आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत मतदान केले. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिश्वा शर्मा यांनीही आपापल्या राज्यांच्या विधानसभेत मतदानाचा हक्क बजावला. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान केले. पिनाराई आणि त्यांच्या आमदारांनी विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या बाजूने मतदान करण्याचे जाहीर केले होते.

जगनमोहन रेड्डी, पटनायक मुर्मूंच्या बाजूने

जगनमोहन रेड्डी यांनी द्रौपदी मुर्मूंच्या बाजूने मतदान करण्याचे जाहीर केले होते. एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू मूळच्या ओडिशाच्या असल्यामुळेच नवीन पटनायक यांनी विरोधी गटात असूनही मुर्मू यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांनीही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान केले

क्रॉस व्होटिंग मुर्मूंच्या पारडय़ात काँग्रेस-सपा-राष्ट्रवादी… प्रत्येक पक्षात खळबळ

देशात अनेक राज्यांमध्ये क्रॉस व्होटिंग झाल्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. गुजरातपासून उत्तर प्रदेशपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सपामध्ये फूट पडली आहे. गुजरातमध्ये राष्ट्रवादीचे आमदार कंधल जडेजा, उत्तर प्रदेशमध्ये सपा आमदार शिवपाल यादव आणि शाहजील इस्लाम आणि ओडिशात काँग्रेसचे आमदार मुकीम यांनी क्रॉस व्होटिंग केले आहे. सर्वांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केल्याचे समजते.

हरियाणातही काँग्रेसला क्रॉस व्होटिंगला सामोरे जावे लागले आहे. पक्षाचे आमदार कुलदीप बिश्नोई यांनी द्रौपदी मुर्मूंच्या बाजूने मतदान केले आहे. ओडिशा-आसाममधील काँग्रेस आमदाराने क्रॉस व्होटिंगचा दावा केला आहे. गुजरात कंधलमधील राष्ट्रवादीचे आमदार कंधल जडेजा यांनी पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळा मार्ग चोखाळत उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान केले. ते पक्षातून वेगळी भूमिका घेतील, अशी भीती त्यांच्याबद्दल आधीच होती. राष्ट्रवादीने यशवंत सिन्हा यांना पाठिंबा जाहीर केला होता. याशिवाय झारखंडमधील राष्ट्रवादीचे आमदार कमलेश सिंह यांनीही द्रौपदी मुर्मूंच्या बाजूने मतदान केले. एवढेच नाही तर गुजरातमधील भारतीय आदिवासी पक्षाचे नेते छोटूभाई वसावा यांनीही द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले आहे. गरिबांच्या प्रगतीसाठी काम करणाऱया अशा नेत्याला मी मतदान केल्याचे ते म्हणाले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षातही फूट पडली आहे. शिवपाल यादव यांनी द्रौपदी मुर्मूंना खुलेआम मतदान केले आहे, तर सपाचेच आमदार शाहजील इस्लाम यांनीही द्रौपदी मुर्मूंच्या बाजूने मतदान केले आहे. बरेलीतील भोजीपुरा येथील पक्षाचे आमदार शाहजील इस्लाम हे काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात होते.

Related Stories

बिहारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 2.21 लाखांच्या उंबरठ्यावर

Tousif Mujawar

रबी पिकांच्या आधारभूत किमतींमध्ये वाढ

Amit Kulkarni

बडगाममध्ये वैद्यकीय पथकावर हल्ला

Patil_p

जुन्या वाहनांच्या विक्री-खरेदीचे बदलले नियम

Patil_p

देशभर ‘हर घर तिरंगा’

Patil_p

डिझेल प्रतिलिटर 25 पैशांनी महाग

Patil_p