सुरक्षित लँडिंगसाठी उपाययोजना : सुविधेचा वैमानिकांना लाभ
प्रतिनिधी /बेळगाव
विमानतळाच्या धावपट्टीवर विमानाचे सुरक्षित लँडिंग व्हावे, यासाठी आरेखन करण्यात येत आहे. मागील दोन दिवसांपासून आरेखन करण्याचे काम करण्यात येत आहे. यामुळे विमानाचे लँडिंग होताना वैमानिकाला मदत होते, तसेच सुरक्षितरीत्या विमान धावपट्टीवर लँडिंग होऊ शकते.
बेळगाव विमानतळावर दररोज 12 ते 14 विमानांची ये-जा असते. त्यामुळे धावपट्टी सुरक्षित असणे आवश्यक आहे. लहान विमानांसोबतच आता बोईंग विमान उतरत असल्याने सर्व सुविधा पुरविणे गरजेचे आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून विमानतळाच्या धावपट्टीवर आरेखन करण्यात येत आहे. मुख्य धावपट्टीसह पार्किंगच्या जागी आरेखन करण्यात आले आहे. यामुळे विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर पार्किंगच्या ठिकाणी पोहचणे सोयीचे ठरत आहे.
पावसाळय़ाच्या दिवसात ढगाळ वातावरणामुळे धावपट्टी शोधताना वैमानिकाची दमछाक होते. बऱयाच वेळा धावपट्टी न मिळाल्याने विमाने माघारी फिरली आहेत. त्यामुळे धावपट्टीवरील आरेखन स्पष्टपणे दिसावे यासाठी विमानतळ सुरक्षा विभागाच्यावतीने आरेखन केले आहे.