ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यभरात लालपरी हळूहळू पूर्वपदावर येत आहे. आतापर्यंत ७० हजार संपकरी एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. २२ एप्रिलपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. त्यानुसार कर्मचारी कामावर रुजू होत आहेत. तर हायकोर्टाच्या आदेशानंतर २६ हजार कर्मचारी नव्याने कामावर हजर झालेत. यात सुमारे २४ हजार ड्रायव्हर तर १९ हजार ५०० कंडक्टरांचा समावेश आहे. आत्तापर्यंत एकूण ७० हजार संपकरी एसटी कर्मचारी कामावर रुजू झालेत. मंगळवारी एका दिवसात ७ हजार ४३५ कर्मचारी कामावर हजर झालेत.
आधी कोरोनामुळे आणि नंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीला मोठा आर्थिक भार सोसावा लागत आहे. कोरोना आणि संपमुळे एसटीचे कोट्यवधींचे नुकसान झाल आहे. ५ महिन्यांच्या कालावधीनंतर आता एसटी कर्मचारी पुन्हा कामावर हजर होण्यास सुरुवात झाली आहे. एसटीचे शासकीय सेवेत विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी कर्मचारी संपावर गेले होते. दरम्यान कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आता कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये एसटीचे ७० हजार संपकरी एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.