लंपास केलेल्या 4.26 लाखांच्या दागिन्यांपैकी बहुतेक ऐवज जप्त
वार्ताहर /केपे
पंटेमळ, कुडचडे येथे काही दिवसांपूर्वी एका फ्लॅटमधून 4 लाख 26 हजार किमतीचे दागिने चोरण्याची घटना घडली होती. या प्रकरणी कुडचडे पोलिसानी तक्रारदाराचा वाहनचालक शहजादा हसन शेख याला अटक केली आहे.
पंटेमळ, कुडचडे येथे डिसेंबर महिन्यात एका बंगल्यातील व्यक्ती लग्नसमारंभाला गेल्याचा फायदा घेत दागिने व रोकड मिळून सुमारे 34 लाखांचा ऐवज चोरण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करून या प्रकरणी दोन चोरटय़ांना अटक केली होती. याचदरम्यान पंटेमळ येथील रिहान शेख यांच्या फ्लॅटमध्ये वरील चोरी झाली होती. 20 ते 24 डिसेबर यादरम्यान त्याच इमारतीच्या तळमजल्यावर राहणारा त्यांचा चालक शहजादा शेख याने फ्लॅटमध्ये कोणी नसल्याची संधी साधून सुमारे 80 ग्रमचे हे दागिने लंपास केल्याचे तपासात दिसून आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहजादा शेख याच्याकडे कारची चावी होती व त्याच चावीबरोबर घरच्या दाराचीही चावी होती. हीच संधी साधून वरील कालावधीमध्ये त्याने चोरी केल्याचे दिसून आले असून यासंबंधी 17 जानेवारी रोजी रिहान शेख यांनी तक्रार नोदवली होती. शहजादा शेख याला अटक करण्यात आली असून लंपास केलेल्या 80 ग्रॅम दागिन्यांपैकी 70 ग्रॅम दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्याने ते वास्को व कुडचडे येथे सफारी दुकानांत विकले होते, असे तपासात उघड झाले.
कुडचडेचे पोलीस निरीक्षक वैभव नाईक यांनी सांगितले की, पंटेमळ येथील फ्लॅटमधील चोरी प्रकरणात फ्लॅटमालकाचा वाहनचालकच गुंतलेला असल्याचे स्पष्ट होताच त्याला अटक करण्यात आली. सदर संशयित शहजादा शेखला न्यायालयासमोर उभे केले असता त्याला 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. या प्रकरणी निरीक्षक नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कुडचडे पोलीस पुढील तपास करत आहेत.