समाजविघातक शक्ती आपले गुन्हें करण्यासाठी कोणत्या मार्गांचा अवलंब करतील याचा काही नेम नसतो. पोलिसांच्या किंवा सुरक्षा यंत्रणांच्या लक्षात येऊ नये, आणि लक्षात आले तरी त्यांना आपल्यापर्यंत पोहचणे शक्य होऊ नये, यासाठी अशा कुशक्ती वेगवेगळे मार्ग शोधत असतात. ड्रग्ज किंवा अंमली पदार्थांची तस्करी हा जगातील काही गंभीर आणि घातक गुन्हय़ांपैकी मानण्यात येतो. अंमली पदार्थांपासून होणारी नागरीकांची शारिरीक आणि आर्थिक हानी रोखण्यासाठी अनेक देशांनी या पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.
तथापि. बंदी घातलेल्या देशांमध्ये तस्करीच्या माध्यमातून या पदार्थांची विक्री केली जाते. त्यामुळे अशा देशांमध्ये हे पदार्थ घुसविण्याची विविध युक्त्या गुन्हेगार शोधत असतात. कॅनडामधील अंमली पदार्थ तस्करांनी अलिकडच्या काळात या साठी कबुतरांचा उपयोग करण्याचे शास्त्र विकसीत केले आहे. कबुतराच्या गळय़ात अंमली पदार्थांनी भरलेल्या छोटय़ा पिशव्या लटकवून त्यांना विशिष्ट देशांमध्ये किंवा त्या देशांमधील विशिष्ट स्थानी सोडले जाते. तेथे या रॅकेटमधील इतर माणसे या पिशव्या काढून घेतात आणि कबुतरांना सोडून देतात. नंतर ही कबुतरे आपल्या मालकाकडे परत येतात. पहिला काही कालावधी ही युक्ती सफल झाली होती. यामुळे कॅनडात अंमली पदार्थांच्या व्यसनांचे प्रमाण वाढले होते.
पण आता कॅनडाच्या पोलिसांनी यावर तोडगा शोधला आहे. अंमल पदार्थांची तस्करी करणारी कब्रुतरे निर्धारित स्थानी न जाता ती आपल्याकडे येतील अशी योजना त्यांनी केलेली आहे. हा उपाय प्रभावी ठरलेला आहे. 27 फेब्रुवारीला अंमली पदार्थ करणारे पहिले कबुतर पकडण्यात आले. त्यावर बांधलेली क्रिस्टल मेथ या अंमली पदार्थाची पिशवी जप्त करण्यात आली आहे. काही दिवसांनी आणखी एक कबुतर पकडण्यात आले. मात्र, त्यावर कोणतीही पिशवी मिळालेली नाही. याचाच अर्थ असा की त्याने अंमली पदार्थांची तस्करी पूर्वीच केलेली होती. आता याच पकडलेल्या प्रशिक्षित कबुतरांचा उपयोग करुन अन्य कबुतरांची दिशा भरकटविण्याचे प्रशिक्षण विकसीत करण्याचा प्रयत्न होत आहे.