पंजाबमध्ये क्वाडकॉप्टर-हेरॉईनचा साठा जप्त
वृत्तसंस्था / चंदीगड
पंजाबमधील गुरुदासपूर जिह्यात बीएसएफच्या जवानांनी प्रतिबंधित अमली पदार्थांच्या तस्करीचा प्रयत्न पुन्हा एकदा हाणून पाडला. पाकिस्तानातून ड्रोनमधून पाठविण्यात आलेले अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. तपास यंत्रणांना शेतात क्वाडकॉप्टर आणि हेरॉईनचा साठा सापडला आहे. रविवारी सकाळी 9.30 च्या सुमारास बीएसएफचे जवान सीमेवर गस्त घालत असताना त्यांना काही संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
गुरुदासपूर जिह्यातील घिनियाके गावाजवळ गस्त घालणाऱया जवानांनी सतर्कता बाळगत अमली पदार्थ तस्करी रोखली. हस्तगत करण्यात आलेल्या साहित्य व उपकरणांची कसून झडती घेतली असता 9 किलो वजन वाहून नेण्यास सक्षम असलेले चिनी क्वाडकॉप्टर (ड्रोन) सापडले. त्यात रिफ्लेक्टर आणि अमली पदार्थांची चार पाकिटेही होती. त्याचे एकूण वजन 2.730 किलो होते. जप्त केलेले ड्रोन चिनी बनावटीचे असल्याचे तपासाअंती दिसून आले. दक्ष बीएसएफ जवानांनी ड्रोनद्वारे प्रतिबंधित वस्तूंची तस्करी करण्याचा नापाक डाव हाणून पाडल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. यापूर्वीही बीएसएफने पंजाबच्या सीमावर्ती जिह्यांमध्ये सीमेपलीकडून ड्रोनद्वारे प्रतिबंधित अमली पदार्थांची तस्करी करणारे ड्रोन जप्त केले आहेत.