हणजूण पोलिसांकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश : एका महिलेसह दोघांच्या मुसक्या आवळल्या
प्रतिनिधी / म्हापसा
हणजूण पोलिसांनी बुधवारी केलेल्या कारवाईत एकूण 10 लाख 20 हजार रुपयांचा एमडीएमए वर्गणीतील घातक अमली पदार्थ शिवोली येथून जप्त केला.
दरम्यान, या प्रकरणात ड्रग्स व्यवसायात असलेल्या आंतरराज्य टोळीशी संबंधित दिल्ली येथील एका महिलेसह बोरीवली-मुंबई येथील कुरबान सलाह शेख(25) या संशयिताच्या मुसक्मया आवळण्यात पोलिसांना यश आले. सध्या दोघांची रवानगी हणजूणच्या पोलिस कोठडीत करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रशल देसाई यांनी दिली.
दरम्यान, आंतरराज्य टोळीशी संबंधित संशयित कुरबान शेख याला एमडीएमए प्रकारच्या अमली पदार्थासह दोन दिवसांपूर्वीच हणजूण पोलिसांनी ताब्यात घेतले होते. परंतु, संबंधित आरोपीचे आंतरराज्य टोळीशी संबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास करताना पोलिसांनी प्रकरणाची कसून चौकशी केली. यामध्ये मूळ दिल्ली येथील महिलेचा (सध्या शिवोली) या प्रकरणात थेट सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
हणजूण पोलिस स्थानकाचे निरीक्षक देसाई यांनी उपनिरीक्षक धीरज देवीदास, अक्षय पार्सेकर, महिला पोलिस निरीक्षक स्नेहा सावळ, कॉन्स्टेबल गोधीश गोलतेकर, महेंद्र मांदेकर, क्रिष्ण बुगडे, रुपेश आजगावकर यांच्या सहकार्याने या प्रकरणात थेट सहभाग असलेल्या दिल्ला येथील महिलेला शिवोली येथून ताब्यात घेण्यात यश मिळविले.