पाचगाव वार्ताहर
शेंडा पार्क येथे लाखो रुपये खर्च करून सुमारे 40 हजार झाडे चार वर्षांपूर्वी लावली आहेत. या झाडांमधील गवत दोन ते तीन फूट उंच वाढले असून आता ते वाळले आहे. या वाळलेल्या गवताला आग लागून झाडे पेटण्याआधी हे गवत कापण्याची गरज आहे.
शेंडा पार्क येथील सुमारे 90 एकर जागेत लाखो रुपये खर्च करून माळरानावर सुमारे 40,000 झाडे लावण्यात आली आहेत. सुरुवातीचे एक वर्षे या झाडांची काळजी घेण्यात आली. या झाडांना उन्हाळ्यात टँकरद्वारे शासनामार्फत पाणी घालण्यात आले. त्यानंतर निधी अभावी या झाडांच्या निगराणी कडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे या झाडांची वाढ खुंटली आहे.
मागील वर्षी या झाडांच्या सभोवती गवत मोठ्या प्रमाणात आले होते. हे गवत काही शेतकऱ्यांनी लिलावात घेतले होते. मात्र या गवताची वेळेत कापणी झाली नव्हती. या वाळलेल्या गवताला मागील वर्षी आठ ते दहा वेळा आग लागून या गवताबरोबरच शेकडून झाडे आगीच्या भक्षस्थानी पडली होती.मागील वर्षी काही वेळा अज्ञातांनी गवत पेटवले होते तर एक वेळा रस्त्याच्या कडेला असणारा कचरा पेटत येऊन या वाळलेल्या गवताला आग लागली आणि या आगीत गवत आणि झाडे भस्मसात झाली होती.आमदार ऋतुराज पाटील आणि काही स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी या झाडांना पाणी घालून ही झाडे जगवण्याचा प्रयत्न केला होता.
यावर्षी चांगल्या पावसामुळे या झाडांची वाढ थोड्याफार प्रमाणात झाली आहे. या झाडांभोवती गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि हे गवत आता वाढलेले आहे. हे गवत वेळेत कापले नाही तर पुन्हा यावर्षी या गवताला आग लागून ही झाडे भस्मसात होण्याचा धोका आहे.असे असताना प्रशासन मात्र या संभाव्य धोक्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.प्रशासनामधील निरढावलेल्या अधिकाऱ्यांना ही झाडे जळाल्यानंतरच जाग येणार काय असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.आमदार ऋतुराज पाटील यांनी यामध्ये लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन या झाडां भोवती वाळलेले गवत तातडीने काढण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
मागील वर्षी आग विझवून अग्निशमन दलाचे कर्मचारीही हतबल झाले होते.मागील वर्षी शेंडा पार्क येथे या झाडांभोवती वाळलेल्या गवताला आठ ते दहा वेळा आग लागली. प्रत्येक वेळी ही आग विझवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेची अग्निशामन दलाची गाडी व कर्मचारी येत होते. वारंवार लागणाऱ्या या आगीमुळे अग्निशमन दलाचे कर्मचारी हतबल झाल्याचे दिसत होते.

