शहर म. ए. समितीच्या बैठकीत निश्चय : येत्या निवडणुकीत एकच उमेदवार देण्याचा निर्णय
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली रविवार दि. 19 रोजी राजहंसगड येथे दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. आपल्या राजाच्या सन्मानासाठी प्रत्येक मराठी भाषिकाने यादिवशी उपस्थित रहायचे आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याप्रमाणे या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार शहर म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला. मंगळवारी मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीत राजहंसगडावरील दुग्धाभिषेक सोहळा व आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. राजहंसगडावर भव्यदिव्य असा सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी कमिटीची स्थापना करण्यात आली असून जय्यत तयारी करण्यात येत आहे. महाप्रसाद, मिरवणूक, गडाची सजावट यासंदर्भात मते मांडण्यात आली.
शहर समितीची पुनर्रचना करा
म. ए. समितीचा मुख्य श्वास म्हणजे शहर म. ए. समिती आहे. परंतु मागील अनेक वर्षांपासून शहर म. ए. समितीची पुनर्रचना करण्यात आलेली नाही. यामुळे बरेच कार्यकर्ते इच्छुक असूनही समितीपासून दुरावले जात आहेत. तरुण कार्यकर्त्यांना सामावून घेऊन शहर म. ए. समितीची पुनर्रचना करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
कार्यकर्त्यांमधून एकीची मागणी
म. ए. समिती मागील 66 वर्षांपासून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी झटत आहे. निवडणूक हा लढ्याचा एक भाग आहे. यावेळी म. ए. समितीला निवडणुकीसाठी पोषक वातावरण असून एक उमेदवार दिल्यास विजय निश्चित आहे. त्यामुळे एकच एक उमेदवार दिला जाईल, यासाठी एकीची मागणी करण्यात आली. तसेच म. ए. समिती जो उमेदवार देईल, त्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचा निश्चय सर्वांनी केला.
निवडणुकीच्या मुद्द्यावरून हमरीतुमरी…
निवडणूक जवळ आल्याने त्या अनुषंगाने चर्चेला सुरुवात होताच मुद्द्यावरून ही चर्चा गुद्यापर्यंत गेली अन् हातघाईवर आली. परस्परांशी वाद-प्रतिवाद करताना कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकारही घडला. काहीच वेळात वाद शमवत बैठकीला पुन्हा सुरुवात झाली.