मद्यपान हे कोणत्याही परिस्थितीत करु नये. कोणतेही, चांगले अगर वाईट, निमित्त त्यासाठी शोधू नये, असे डॉक्टर्स नेहमी सांगतात. कारण मद्यपान हे प्रकृतीला वाईटच असते. विशेषतः ते स्पर्धेने होत असेल तर आपण किती पितो आणि नंतर त्याचे परिणाम काय होतील, याचे भान अनेकांना रहात नाही. अतिरिक्त मद्यपानाची सवय ही केवळ आपल्या प्रकृतीचा नव्हे, तर आपला पैसा आणि कौटुंबिक स्वास्थ्य यांचाही नाश करते. म्हणून ते टाळावेच.
36 वर्षांच्या ज्युलिया अँडरसन यांनी आपली एक कथा प्रसारित केली आहे. त्यातून हेच सत्य उघड होत आहे. ज्युलिया यांना मद्यपानाची घातक सवय जडली. त्यानंतर ती वाढत गेली. आपण काही चुकीचे करत आहोत हे त्यांच्या लक्षातच आले नाही. त्यांनी एकदा आपल्या मैत्रिणींसमवेत पार्टी करताना तब्बल 20 पेग मद्य बसल्या बैठकीला संपवले. त्यानंतर त्या काही दिवस बेशुद्धावस्थेत होत्या. बेशुद्ध पडण्याआधी त्यांनी त्यांचे पाय दुमडून घेतले होते. त्याच अवस्थेत त्या बेशुद्ध झाल्याने त्यांच्या पायांचा रक्तपुरवठा थांबला. त्या शुद्धीत आल्या तेव्हा दोन्ही पाय अक्षरशः निकामी झाले होते. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र. त्यांचे पाय बरे झाले नाहीत. अखेर शस्त्रक्रिया करुन ते काढून टाकण्यात आले. त्यांची मद्यपानाची सवय अशी त्यांच्यासाठी घातक ठरली आहे.