मणेराजूरीतील महाविद्यालयीन विद्यार्थीनींनी एसटी बस रोखल्या
मणेराजूरी / वार्ताहर
एसटी प्रशासन डेपोतून ज्यादा बस सोडत नसल्याने तसेच बसमध्ये जागाच नसल्याने तासगावमधील सर्व विद्यार्थीनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. ‘महिला तंत्रनिकेत विद्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी चार ते पाच एसटी बस विद्यार्थिनींनी रोखून धरल्या.
याबाबतची माहिती अशी की : मणेराजूरीसह परिसरातून चारशे ते पाचशे मुले- मुली तासगांव शहरातील विविध महाविद्यालयात शिक्षण घेतात. कवठेमहांकाळ डेपोच्या सकाळी सात ते अकरा वाजेपर्यत तीन ते चार बसेस धावतात. सायंकाळी कॉलेज सुटल्यानंतरही 4 ते 5 च्या दरम्यान फक्त 2-3 बसेस धावतात. त्यामुळे एवढया मोठ्या संख्येने असलेल्या विद्यार्थ्यांची विषेशत: विद्यार्थिनींची मोठी गैरसोय होत आहे. येणाऱ्या बसमध्ये उभा राहण्यासाठी जागा नसल्याने रात्री आठपर्यंत बसची वाट पहावी लागते. यामुळे पालकांचीही चिंताही वाढत आहे. याबाबत ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने वेळोवेळी तासगाव व कवठेमहांकाळ आगाराला तोंडी व लेखी कळवून देखील याकडे दुर्लक्ष झाले आहे.
मंगळवारी पाच वाजता तासगावकडून मणेराजूरीकडे येणारी बस फुल्ल होवून तासगांव कॉलेज व महिला तंत्रनिकेतन जवळ येताच बसमध्ये जागाच नसल्याने विदयार्थीनी आक्रमक झाल्या. सर्व विद्यार्थिनींनी कवठेमहाकाळ एसटी डेपोचा निषेध करत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करुन बस रोखून धरल्या. विद्यार्थ्यांनी या मार्गावरील 4 ते 5 बसेस अडवून ठेवल्या. सुमारे दोन तास मुलींनी बस रोखल्या होत्या. शेवटी डेपोने ज्यादा बस सोडल्याने तणाव निवळला. कवठेमहांकाळ व तासगांव डेपोने या मार्गावर सकाळी व सायंकाळी ज्यादा बस सोडाव्या अशी विदयार्थीनींची मागणी आहे .