सर्वच व्यवहार ऑनलाईन, मोजके व्यवहार होतायेत कागदोपत्री
प्रतिनिधी/ बेळगाव
उपनोंदणी कार्यालयानंतर सर्वात महसुल देणारे कार्यालय म्हणून आरटीओकडे पाहिले जाते. या आरटीओचा कारभारही आता ऑनलाईनच्या माध्यमातून होत आहे. कर भरणारे, परवाना काढणारे वाहन चालक ऑनलाईनच्या माध्यमातूनच सर्व व्यवहार करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयात होणारी गर्दी आता कमी होत आहे. अनेक जण आपले व्यवहार ऑनलाईन करत असल्यामुळे आरटीओ कार्यालयातील एजंटराज कमी होताना दिसत आहे. केवळ मोजकेंच व्यवहार आता कागदोपत्रे चालत आहेत.
केंद्र सरकारने ऑनलाईनच्या माध्यमातूनच सर्व व्यवहार होण्याकडे भर दिला आहे. आता रोख रक्कम किंवा बँकमध्ये जाऊन डीडी काढण्याऐवजी थेट ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही संबंधित विभागाच्या वेबसाईटवर अथवा ऍपवर रक्कम जमा करु शकतो. जमा केल्यानंतर काही वेळातच रक्कम जमा झाल्याचे एसएमएस देखील येत असतात. त्यामुळे व्यवहारामध्ये पारदर्शकता तर येतेच. मात्र यामुळे वेळ वाचतो. आरटीओ कार्यालयामध्ये यापूर्वी प्रत्येक व्यवहार कागदोपत्री नोंद करुन होत होता. त्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. मात्र आता ऑनलाईनवर केवळ एका क्लीकमध्ये सर्व माहिती उपलब्ध होते. त्यामुळे अधिक तर व्यवहार ऑनलाईनच होत आहेत. परिणामी कार्यालयात होणारी गर्दीही कमी झाल्याने अधिकाऱयांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
आरटीओ कार्यालयात नेहमीच गजबजलेले असायचे. त्यामुळे येथे एजंटांबरोबरच नागरिकांचीही मोठी धावपळ व्हायची. वाहन परवाना काढण्यासाठी तर लांबच्यालांब रांगा लागायच्या. त्यामुळे कधी एकदा परवाना मिळतो आणि कधी यातून मोकळीक होतो? असा प्रश्न संबंधित परवानाधारकांनका पडायचा. मात्र आता सर्व कामे ऑनलाईन झाल्याने येथील गर्दींबरोबरच गाजावाजाही कमी झाला आहे. त्यामुळे अधिकारीही आपली कामे वेळेवर पूर्ण करतानाचे चित्र दिसून येत आहे.
आरटीओ कार्यालयात रोख रक्कमेऐवजी ऑनलाईनव्दारे थेट सरकारच्या तिजोरीत रक्कम जमा होताना दिसत आहे. ब्रिटीश कारभाऱयांनी वाहतुकीचे नियम लावण्यासाठी आणि कर गोळा करण्यासाठी या कार्यालयाची स्थापना केली आहे. जुनी कागदपत्रे तसेच इतर काही व्यवहार आता कागदपत्रांवर चालत असला तरी इतर सर्व कारभार किंवा पैशांचे अधिक तर व्यवहार हे ऑनलाईन झाले आहेत. त्यामुळे येथील एजंटगिरीला काही प्रमाणात चाप बसला आहे. वाहने जप्त किंवा दंड आकारणी हे सर्व व्यवहार आता अधिकतर ऑनलाईन करण्यात येत आहेत. त्यामुळे या परिसरात होणारी गर्दी टळली आहे.