मडगावचे नगरसेवक महेश आमोणकर यांची प्रतिक्रिया
प्रतिनिधी /मडगाव
सोनसडा येथे कब्रस्तानसाठी जागा संपादित करण्यात आली असतानाही काही जणांकडून कब्रस्तान खारेबांध येथे उभारण्याचा प्रयत्न झाला. त्या पर्यायी जागेवर पाणी साचत असल्याने त्या ठिकाणी कब्रस्तान शक्यच नव्हते. त्यामुळे कब्रस्तानसाठी लढा द्यावा लागला. त्याअंतर्गत आपण केलेल्या उपोषणालाही सर्वांचा पाठिंबा लाभला. आता न्यायालयाच्या आदेशामुळे मुस्लिमबांधवांना हक्काचे कब्रस्तान मिळणार आहे, असे मडगाव पालिकेचे नगरसेवक महेश आमोणकर यांनी म्हटले आहे.
उच्च न्यायालयाने सोनसडा येथील संपादित जागेत कब्रस्तान उभारणीचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना नगरसेवक आमोणकर यांनी ही प्रतिक्रिया दिली. प्रभाग 15 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागातील काही मुस्लिमबांधवांनी आपणाकडे येऊन कब्रस्तानसाठीच्या पर्यायी जागेवर पाणी साचत असल्याने तेथे ते उभारणे शक्य नसल्याचे म्हटले होते व त्या ठिकाणी कब्रस्तान न करण्याची मागणी केली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्याधिकारी आम्नेलो फर्नांडिस यांची भेट घेतली असता त्यांनी सोनसडा येथील जागा कब्रस्तानसाठी आरक्षित करण्यात आलेली आहे, असे स्पष्ट केले होते. आमदार दिगंबर कामत यांनी सोनसडा येथील जागा कब्रस्तानसाठी संपादित केली होती, याकडे आमोणकर यांनी लक्ष वेधले.
काही जणांना सोनसडय़ावर कब्रस्तान नको असल्याने त्यांनी खारेबांध परिसरात कब्रस्तान आणण्याचे योजिले होते. आपण जानेवारी, 2021 मध्ये कब्रस्तान उभारणीसाठी उपोषणही केले. त्यावेळी मुस्लिमांसह हिंदूबांधवांचाही पाठिंबा मिळाला होता, असे ते म्हणाले. नुकताच उच्च न्यायालयाने सोनसडा येथे कब्रस्तान उभारणीचे काम 29 नोव्हेंबरपासून सुरू करून सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा आदेश दिला असल्याने नगरसेवक आमोणकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.