Tarun Bharat

दुर्गे दुर्घट भारी…

Advertisements

सध्या नवरात्रीच्या निमित्ताने सर्वत्र दुर्गा पूजेचा उत्सव उत्साहाने साजरा केला जात आहे. पण कलियुगाच्या प्रभावाने या उत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यासाठी मूळ दुर्गादेवी कोण आहे आणि तिची पूजा का व कशी करतात ह्याचे वेदिक शास्त्राच्या आधारे स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम दुर्गादेवीच्या आरतीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू. दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी। वारी वारिं जन्ममरणाते वारी ।हारी पडलो आता संकट नीवारी ।।1।। जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी  । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ।।धृ.।। त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऐसे नाही ।चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं । साही विवाद करितां पडिले प्रवाही। ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ।।2 ।। प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां । क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा । अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा । नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ।।3 ।। अर्थात ‘हे दुर्गादेवी, तुझ्या कृपेशिवाय या दुर्गम संसारसागरातून मुक्त होणे अतिशय कठीण आहे. हे अनाथांच्या नाथा, अंबामाता माझ्यावर आपल्या करुणेचा विस्तार कर. पुन्हा पुन्हा येणाऱया जन्म-मृत्यूच्या चक्रासमोर मी आता माझी हार स्वीकारतो आहे, मला कृपा करून या जन्म-मृत्यूच्या संकटातून सोडव. जय हो, जय हो जिने महिषासुराचा वध केला, जी तारणहार आहे आणि संजीवनी देणारी आहे म्हणून देवीदेवताही जिचा गौरव करतात. त्रिभुवनामध्ये तुझ्यासारखा कृपाळू कोणी नाही. चारी वेदही तुझे पूर्ण गुणगान करताना थकून जातात. साही विवाद (वेद, वेदान्त, सांख्य, योग, न्याय आणि मीमांसा करणारे) करणारेही वितंडवादाच्या प्रवाहात वाहत जातात तरीही त्यांना तू प्राप्त होत नाहीस पण भक्तांना क्षणार्धात प्राप्त होतेस. हे प्रसन्नवदना, तू आपल्या निजसेवकांवर प्रसन्न होतेस, मला भवपाशाच्या क्लेशातून मुक्त कर, तुझ्यावाचून माझी ही इच्छा कोण पूर्ण करणार. तुझ्या चरणकमळांच्या धूलिकणांमध्ये नरहरी तल्लीन झाला आहे.

दुर्ग याचा अर्थ आहे तट किंवा तुरुंग. आपण राहत असलेले जग हे तुरुंगाप्रमाणे आहे आणि येथे जन्म घेणाऱया प्रत्येक व्यक्तीला दररोज आधिभौतिक म्हणजे निसर्गापासून होणारे त्रास, आधिदैविक म्हणजे इतर जीवांपासून होणारे त्रास आणि आध्यात्मिक म्हणजे मन व इंद्रियांपासून होणारे त्रास सहन करावे लागतात.  ह्यांना त्रिविध ताप असेही म्हणतात. दुर्गा ही या तुरुंगसम भौतिक जगाची अधि÷ात्री देवता आहे आणि तिच्या हातामध्ये असलेल्या त्रिशुळाने ती जीवांना त्रिविध तापाचे त्रास देऊन जाणीव करून देते की ह्या शिक्षेतून मुक्त व्हा. त्याचप्रमाणे ह्या तुरुंगात असलेल्या जिवांना जन्म-मृत्यूची ही अंतिम शिक्षा होते. म्हणून या आरतीमध्ये वरील सर्व क्लेशातून मुक्त करण्यासाठी दुर्गादेवीकडे प्रार्थना करण्यात आली आहे. आपल्या सामर्थ्यावर ह्या क्लेशातून मुक्त होणे अशक्मय आहे म्हणून म्हटले आहे की मी आता माझी हार स्वीकारतो आहे. ह्या नम्र भावनेने आपण दुर्गादेवीकडे गेल्यास ती कृपाळूपणे आपल्याला या दुःखमय जगातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवू शकते. भगवंताच्या सृष्टीमध्ये दुर्गादेवी एका तुरुंगाधिकाऱयाप्रमाणे सेवा करीत असते. जे जीव भगवंताच्या आज्ञेचे उल्लंघन करतात त्यांना दुर्गादेवीच्या अधिपत्याखाली भौतिक जगाच्या प्रभावाखाली तुरुंगाप्रमाणे असलेल्या या जगात ठेवले जाते. या तुरुंगाच्या अदृश्य भिंती सत्त्व, रज आणि तम् या तीन गुणांनी बनलेल्या आहेत. वास्तविक दुर्गा हे भगवंताच्या शक्तीचे परिवर्तित स्वरूप आहे. ब्रह्मसंहितामध्ये ब्रह्माजी सांगतात ः सृष्टिस्थितिप्रलयसाधनशक्तिरेका छायेव यस्य भुवनानि बिभर्ति दुर्गा। इच्छानुरूपमपि यस्य च चेष्टते सा गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि।। अर्थात ‘मी आदिपुरुष श्रीगोविंदांना नमन करतो, कारण बहिरंग शक्ती ‘माया’ ही ‘चित’ शक्तीच्या छायेप्रमाणे आहे. तिचे ‘दुर्गा’ रूप सर्व लोकांमध्ये पूजिले जाते. ती या भौतिक जगाची उत्पत्ती, रक्षण तसेच संहाराची प्रमुख आहे, तरीही हे सर्व कार्य ती भगवान श्रीकृष्णाच्या इच्छेनुसार करते.’

दुर्दैवाने कलियुगाच्या  प्रभावामुळे  आणि आध्यात्मिक अज्ञानामुळे आजकाल तथाकथित धार्मिक लोक देवीदेवतांची उपासना ही स्वतःच्या इंद्रियतृप्तीकरता करतात. शिव, गणपती, दुर्गा अशा शक्तिमान देवता जीवांच्या कल्याणासाठी दुर्मीळ अशी श्रीकृष्णभक्ती देऊ इच्छितात पण अशा देवीदेवतांचे भक्त मात्र त्याकडे दुर्लक्ष करून अशा देवदेवतांच्या नावावर आपल्या मनाप्रमाणे वागून खरेतर अधर्मच करतात. अशा तथाकथित देवीभक्तांची निंदा करताना संत तुकाराम महाराज म्हणतात अवघ्या पापें घडला एक । उपासक शक्तीचा ।।1।। त्याचा विटाळ नको अंगा । पांडुरंगा माझिया ।।2।। काम क्रोध मद्य अंगी । रंगला रंगी अवगुणी ।।3।। करितां पाप न धरी शंका । म्हणे तुका कोणीही ।।4।। अर्थात ‘सर्व पापांचा पुतळा म्हणजे शक्तीचा उपासक. हे पांडुरंगा  अशा माणसाचा विटाळ माझ्या अंगाला होऊ देऊ नकोस. ह्यांच्यामध्ये एकही चांगला गुण नसतो कारण तो कामवासनेने, क्रोधाने बरबटलेला आणि दारू पिणारा असतो. तुकाराम महाराज म्हणतात, असे लोक कोणतेही पाप करण्यास मागेपुढे पहात नाहीत. 

अशाच आशयाचा एक श्लोक भगवद्गीतेमध्ये आहे. या श्लोकात देवीदेवतांच्या उपासकांचे वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात (भगी7.20) कामैस्तैस्तैर्हृतज्ञानाः प्रपद्यन्ते।़न्यदेवताः । तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया।। अर्थात ‘ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावले आहे, ते अन्य देवीदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात’.  वरील दोन्ही प्रसंगांमध्ये देवीदेवतांची निंदा केली नसून त्यांच्याकडे चुकीच्या मार्गाने जाणाऱया आणि  गीता-भागवतचा शास्त्राधार  सोडून आपल्या मनाप्रमाणे वागणाऱया अज्ञानी भक्तांची निंदा केली आहे. निंदा करण्याचा उद्देश त्यांचा तिरस्कार करणे नसून त्यांना योग्य मार्गावर आणणे हा आहे.

पूर्वी धार्मिक कार्यक्रम म्हणजे हरिकथा, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद असे समाजाला धार्मिक मूल्यांचे प्रबोधन करण्याचे निरनिराळे कार्यक्रम असत. पण आता  दुर्गापूजेच्या निमित्ताने आपण पाहतो आहोत की धर्माच्या नावाने कसा अधर्म केला जातो आहे. दुर्गा मातेला जे हवे ते करण्याऐवजी आपल्याला हवे ते करण्यालाच लोक धर्म समजतात. कर्कश आवाजातली सिनेमातील गाणी लावून कामुक अंगविक्षेप करीत नृत्य करून एकमेकांना आकर्षित करणे ह्याने दुर्गादेवी कधीही प्रसन्न होणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे भगवती । नेईल अंती आपणाते ।। अर्थात ‘अशा  लोकांची समजूत असते की दुर्गा देवी तिच्या लोकी आपल्याला स्थान देईल.’

खरेतर दुर्गादेवीचे स्मरण आपण वरील आरतीमध्ये दिलेल्या क्लेशामधून मुक्त होण्यासाठी केले पाहिजे. पण त्याकडे आपले संपूर्ण दुर्लक्ष होत आहे हे लोक जाणत नाहीत. त्यासाठी दुर्गेची आरती रचणारे नरहरी एका अभंगात सांगतात  सकळ धर्माचें कारण । नामस्मरण हरिकीर्तन ।।1।। दया क्षमा समाधान । घ्यावे संतांचें दर्शन ।।2।।संत संग वेगीं । वृत्ति जडों पांडुरंगीं ।।3 ।।नरतनु येयाची बा कदां । भावें भजा संत पदा ।।4 ।। भुलू नका या संसारिं । हरी उच्चारी उच्चारी ।।5।। सर्व जायाचें जायाचें । हरि नाम हेंचि साचें ।।6।। विठोबा रक्षिल शेवटीं । उभा कर दोन्ही कटीं ।।7।। नरहरी जाणूनि शेवटीं । संतचरणा घाली मिठी ।।8।। अर्थात ‘सर्व धर्माचे कारण आहे हरिनाम संकीर्तन. दया क्षमा हा भाव ठेवून संतांचे दर्शन घ्यावे. संत संग केल्याने आपली वृत्ती पांडुरंगाच्या चरणी स्थिर राहते. मनुष्य जन्म मिळाला आहे तर संतांच्या चरणांचा आश्रय घ्यावा. या संसारामध्ये न गुरफटता हरिनामाचा उच्चार सतत करावा. सर्व काही आपल्या हातून निसटून जाणार आहे त्यासाठी हरिनाम हेच सत्य आहे हे जाणावे. केवळ कमरेवर हात ठेवून उभे असलेले विठ्ठलच आपले मृत्यूसमयी रक्षण करतात. हे सत्य जाणून नरहरी शेवटी संतचरणाला मिठी मारीत आहे. दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी हा एकमेव प्रामाणिक मार्ग आहे. 

-वृंदावनदास

Related Stories

बलसागर भारत होवो…

Patil_p

‘नाजूक शिडी’ वरून राजकारण्यांची घसरगुंडी!

Amit Kulkarni

बिहारमधील निवडणुकीत चमत्कार होणार काय?

Patil_p

गुणांची साम्यावस्था हेच प्रकृतीचे स्वरूप आहे

Amit Kulkarni

ऐसें तव गुणकथामृत

Patil_p

एकीकडे कोरोना तर दुसरीकडे पाणी संकट!

Patil_p
error: Content is protected !!