गोव्यासाठी अभिमानास्पद बाब
क्रीडा प्रतिनिधी /फोंडा
भारतीय मल्लखांब महासंघाच्या अध्यक्षपदी गोव्याच्या दुर्गेश गावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महासंघाची विशेष आमसभा नुकतीच दिल्ली येथे झाली. यात 25 राज्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. मल्लखांब महासंघाचे अध्यक्षपद प्राप्त झालेले ते पहिले गोमंतकीय असून ही अभिमानास्पद बाब आहे.
या आमसभेत अध्यक्षाची निवड करणे हा एकमेव विषय होता. दुर्गेश गावकर हे महासंघाचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. मल्लखांब खेळाचा ऑलिम्पिक स्पर्धेत समावेश व्हावा यासाठी प्रयत्न होत आहेत. नवे अध्यक्ष यासाठी प्रयत्न करणार आहेत. यापुर्वी माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार दिगंबर कामत हे स्विमिंग महासंघाचे तसेच माजी खासदार रमाकांत आंगले हे बेसबॉल महासंघाचे अध्यक्ष होते. दुर्गेश गावकर हे पैगिण काणकोण येथील श्रद्धानंद विद्यालयात शारीरिक शिक्षक आहेत. ते हायस्कूल तसेच परिसरातील इतर विद्यार्थी व खेळाडूंना विविध खेळात मार्गदर्शन करीत आहे. खासकरून मल्लखांबसह, ऍथलेटीक्स, योग, कबड्डी व खो-खो या खेळाचा प्रचार व प्रसारासाठी ते कार्य करीत आहेत.