ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर होणार की नाही, याबाबत संभ्रम असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठं भाष्य केलं आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होईल, त्याबद्दल कोणीही संभ्रमात राहू नये, असा निर्धार व्यक्त करत त्यांनी पदाधिकाऱ्यांना मेळाव्याच्या दृष्टीने शाखा स्तरावर बैठका घेण्याचे आणि मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर मोठी गर्दी जमवण्याचे आदेश त्यांनी दिले.
शिवसेना भवनमध्ये झालेल्या पदाधिकारी बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज्य सरकारवरही टीकास्त्र डागले. दोन महिन्यात वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? गुजरात हा महाराष्ट्राचा भाऊ असल्याचे विरोधक सांगतात. पण हा प्रकल्प गुजरातमध्ये जात असताना सध्याचं राज्य सरकार काय करत होतं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच वेदांता आणि फॉक्सकॉन सारख्या कंपन्या राज्याबाहेर गेल्यामुळे राज्याचं नुकसान झालं आहे. सत्ताधाऱ्यांनी याचं आत्मपरीक्षण करावं, असेही त्यांनी सांगितलं.