विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
बेळगाव / प्रतिनिधी
राज्य सरकारने सोमवार दि. 3 ते रविवार दि. 16 ऑक्टोबरपर्यंत दसरा सुटी जाहीर केली होती. काही जिल्हय़ांमध्ये सुटीमध्ये बदल करण्यात आल्याने उलटसुलट चर्चा सुरू होती. परंतु बेळगाव जिल्हय़ात दि. 3 ते 16 ऑक्टोबर दरम्यानच सुटी देण्यात आली आहे.
कर्नाटकात दसरोत्सव उत्साहात साजरा केला जात असल्याने शाळा, महाविद्यालयांना सुटी दिली जाते. यावर्षी राज्य सरकारने 3 ते 16 ऑक्टोबर दरम्यान दसरा सुटी जाहीर केली होती. परंतु म्हैसूर व बेंगळूर येथील लोकप्रतिनिधींनी मागणी केल्याप्रमाणे त्या शाळांना 25 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान सुटी जाहीर करण्यात आली. तसेच इतर जिल्हय़ातही स्थानिक जिल्हा पंचायत अधिकाऱयांना सुटी निश्चित करण्याचा अधिकार देण्यात आला होता.
बेळगाव जिल्हय़ामध्ये सरकारच्या सूचनेनुसार 3 ते 16 ऑक्टोबर दरम्यान दसरा सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसे पाहिल्यास शनिवार दि. 1 रोजी शाळा सुटल्यापासूनच या सुटीला सुरुवात होते. परंतु रविवारी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळांमध्ये बोलावून गांधी जयंती साजरी केली जाणार आहे. त्यामुळे सोमवार दि. 3 ऑक्टोबरपासून दसरा सुटीला सुरुवात होणार आहे.
इंग्रजी माध्यम शाळांच्या सुटीत बदल
शहरातील इंग्रजी माध्यम शाळांनी 3 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सुटी दिली आहे. इंग्रजी शाळांना डिसेंबर महिन्यात ख्रिसमस दरम्यान दहा दिवस सुटी दिली जात असल्याने दिवाळी सुटीमध्ये शाळांनी कपात केली. प्रत्येक शाळेने सुटीचे वेळापत्रक तयार केले असून, विद्यार्थ्यांच्या पालकांना पाठविण्यात आले आहे.