क्यूट दिसली तरच ब्रँड्स संपर्क साधणार
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने एका मुलाखतीत सोशल मीडियाद्वारे होणाऱया कमाईचा खुलासा केला आहे. सोशल मीडिया अकौंट्स माझ्यासाठी आलिशान जीवन जगण्यासाठी ईएमआय भरण्यासाठी असल्याचे तिने म्हटले आहे.
चित्रपटांमध्ये मध्यमवर्गीय अन् साधारण दिसणारी मुलगी सोशल मीडियावर वेगळय़ाप्रकारे दिसून येत असल्याचा मुद्दा लोक अनेकदा उपस्थित करत असतात. परंतु अशाप्रकारचा विचार मी करत नाही. एक गोष्ट माझ्या कलेचा हिस्सा आहे, तर दुसरी गोष्ट माझ्या वैयक्तिक आयुष्यातील हिस्सा आहे. अधिकाधिक रियल रहावे असा माझा प्रयत्न असतो. चित्रपटात मिळणारी भूमिका प्रभावीपणे साकारण्यावर माझा विश्वास आहे. वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून स्वतःची व्यक्तिरेखा उत्तमप्रकारे निभावणाराच चांगला कलाकार असतो असे जान्हवीने म्हटले आहे.
सोशल मीडियाचा उद्देश मौजमस्ती करणे असतो. मी माझ्या या पोस्ट्सद्वारे ब्रँड्सनी माझ्याशी संपर्क साधावा असा माझा प्रयत्न असतो. या ब्रँड्सच्या जाहिराती करून मी स्वतःचा ईएमआय भरत असते. आयुष्यात कुठलीच गोष्ट गांभीर्याने न घेण्यावर माझा भर असतो. सोशल मीडिया माझ्यासाठी एक मजेशीर पर्याय आहे. मी जर क्यूट दिसले तर आणखी लोक माझे छायाचित्र पाहतील. ब्रँड्स माझ्याशी करार करतील आणि यातून मी अधिक कमाई करू शकेन असे तिचे म्हणणे आहे.
जान्हवीने 2018 मध्ये ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. तर जान्हवीचा ‘मिली’ हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. मिस्टर अँड मिसेस माही, बवाल, दोस्ताना 2 आणि किट्टी या चित्रपटांमध्ये ती मुख्य भूमिका साकारताना दिसून येणार आहे.