Tarun Bharat

शिवसेनेतील भुकंपाचे गोकुळमध्ये हादरे ? आमदारांच्या बंडानंतर जिल्हय़ातील राजकीय समीकरणे बदलणार

सत्ताबदलाच्या हालचाली; महादेवराव महाडिक यांची चाचपणी

कोल्हापूर/ धीरज बरगे
आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेत झालेल्या राजकीय भुकंपाचे हादरे पुढील काळात गोकुळ पर्यतही पोहचण्याची शक्यता आहे. राज्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या शिंदे गटामुळे जिल्हय़ातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. या समीकरणांचा फायदा घेत गोकुळमध्येही सत्ताबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडून सत्तांतर घडविण्यासाठी चाचपणी सुरु आहे. सत्ताबदल्याच्या आखाडय़ात आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके यांची भुमिका महत्त्वाची ठरणार आहे. ऑगस्ट महिन्यात होणाऱया वार्षिक सर्वसाधरण सभेनंतर सत्तांतराच्या हालचाली गतीमान होण्याची शक्यता आहे.

जिल्हय़ाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणाऱया गोकुळमध्ये तब्बल चार दशकानंतर सत्तांतर झाले. माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील आणि गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांच्या एकहाती सत्तेला तत्कालीन पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने सुरुंग लावला. अनेक दिग्गज संचालकांना धक्का देत राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने २१ पैकी १७ जागांवर बाजी मारत एकहाती सत्ता मिळवली. नवीन संचालक मंडळाची नुकतीच वर्षपूर्ती झाली. तोच आता राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर भविष्यात गोकुळचे राजकारणही ढवळण्याची शक्यता आहे.

कोरे, आबिटकर, नरकेंची भुमिका निर्णायक

राज्यातील राजकारण आमदार विनय कोरे भाजपसोबत असले तरी गोकुळच्या राजकारणात मात्र ते सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यासोबत राहीले. मात्र त्यांची सध्या भाजपसोबत जवळीक वाढली आहे. आमदार प्रकाश आबिटकर शिंदे गटात गेले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत नरके यांचे विरोधक आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांना नरकेंचा विरोध असतानाही सतेज पाटील यांनी अध्यक्षपद दिले. यामुळे नरके काहीसे नाराज आहेत. नरके यांनी अद्याप भुमिका जाहीर केली नसली तरी त्यांचाही कल शिंदे गटाकडे आहे. कोरे, आबिटकर, नरके यांचे गोकुळमध्ये प्रत्येकी दोन संचालक आहेत. सत्तांतराच्या हालचाली झाल्यास त्यांची भुमिका निर्णायक ठरणार आहे.

सत्तांतराचे समिकरण असे

महाडिक यांच्या नेतृत्त्वाखालील आघाडीचे गोकुळमध्ये चार संचालक आहेत. तर विनय कोरे यांचे अमरसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश आबिटकर यांचे नंदकुमार ढेंगे, अभिजीत तायशेटे, चंद्रदीप नरके यांचे अजित नरके आणि एस. आर. पाटील हे संचालक आहे. सत्ताधारी गटाचे सहा संचालक आणि महाडिक गटाचे चार असे दहा संचालक भाजप-शिंदे गटाच्या माध्यमातून एकत्र येण्याची शक्यता आहे. तर डॉ. सुजित मिणचेकर यांचेही बळ महाडिक गटाला मिळेल अशीही चर्चा आहे. हे समिकरण जुळल्यास गोकुळमध्ये सत्तांतर शक्य आहे.

पाटील, खाडे, घाटगे यांचीही भुमिका महात्त्वाची

पुढील काळात गोकुळचे राजकारण पक्षीय पातळीवर जाण्याची शक्यता आहे. कोरे भाजपसोबत असले तरी त्यांच्या गटाचे संचालक अमरसिंह पाटील हे काँग्रेससोबत आहेत. जि. प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि पी. एन. पाटील यांची जवळीक वाढली आहे. पी. एन. गटाचे बाळासाहेब खाडे हे विरोधी आघाडीचे संचालक आहेत. कागल तालुक्यातील राजकारणात शिवसेनेचे माजी आमदार संजयबाब घाटगे यांची आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी जवळीक वाढली आहे. घाटगे यांचे चिरंजीव अंबरिषसिंह घाटगे गोकुळमध्ये विरोधी आघाडीचे संचालक आहेत. त्यामुळे सत्तांतराच्या हालचालींमध्ये विरोधी आघाडीचे संचालक खाडे, घाटगे आणि सत्ताधारी गटासोबत असणारे अमरसिंह पाटील यांची भुमिका महत्त्वाची ठरणार आहे.

ज्येष्ठ संचालक ‘आप्पां’च्या संपर्कात
गोकुळमध्ये सत्तांतर घडविण्यासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडून हालाचाली सुरु झाल्या आहेत. सध्याच्या सत्ताधारी गटातील एक ज्येष्ठ संचालक नाराज असल्याचे समजते. हे संचालक आप्पांच्या संपर्कात असल्याची चर्चा गोकुळच्या राजकीय वर्तुळात आहे.

Related Stories

विकेंड लॉकडाऊनची कडेगांव शहरात कडक अंमलबजावणी

Archana Banage

उड्डाणपुलाची निर्मिती शेतकऱयांच्या मुळावर

Amit Kulkarni

राज ठाकरेंना रोखण्यासाठी खा. ब्रिजभूषण सिंह जमवणार 5 लाख लोक

Abhijeet Khandekar

पंखे चोरणाऱयाला अटक

Omkar B

येडियुरप्पा यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

Archana Banage

फुटपाथ रिकामी करण्याची फेरीवाल्यांना सूचना

Amit Kulkarni