संयुक्त राष्ट्रसंघ महासचिवांचा इशारा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
संयुक्त राष्ट्रसंघ हवामान बदल परिषद (सीओपी27) इजिप्तच्या शर्म अल-शेखमध्ये 6-18 नोव्हेंबरदरम्यान आयोजित होणार आहे. या परिषदेत जगभरात होणाऱया हवामान विषयक घटनांवर चर्चा होणार आहे. पृथ्वी ‘हवामान अराजकते’च्या दिशेने वाटचाल करत असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघ महासचिव अँटोनियो गुतेरेस यांनी या पार्श्वभूमीवर दिला आहे. इजिप्तमध्ये होणाऱया हवामान शिखर परिषदेत जागतिक नेत्यांनी कार्बन उत्सर्जनातील कपातीसाठी ठोस निर्णय घ्यावेत असे आवाहन गुतेरेस यांनी केले आहेत.
हवामान बदलावर संयुक्त राष्ट्रसंघ प्रेमवर्क कन्व्हेंशनच्या 198 सदस्यांची 27 वी वार्षिक परिषद होणार आहे. या परिषदेला सीओपी27 या नावानेही ओळखले जाते. या महत्त्वपूर्ण परिषदेत उत्सर्जन घटविणे याचबरोबर विकसनशील देशांना नुतनीकरणीय ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी मदत करण्यावर भर असणार आहे. विकसित देशांनी आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य प्रदान करावे असे गुतेरेस यांनी म्हटले आहे.
ग्रीनहाउस गॅसचे उत्सर्जन उच्चांकी स्तरावर वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 2030 पर्यंत ग्रीनहाउस गॅसचे उत्सर्जन 45 टक्क्यांनी कमी होणे आवश्यक असल्याचे वैज्ञानिक सांगत असताना हे उत्सर्जन वाढत चालले आहे. पॅरिस येथे 2015 मध्ये झालेल्या करारानुसार तापमानवाढ रोखण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.
ग्रीनहाउस गॅसचे उत्सर्जन आता 10 टक्क्यांनी वाढले आहे. यामुळे चालू शतकाच्या अखेरपर्यंत 2.8 अंश सेल्सिअसने तापमानवाढ होण्याची भीती निर्माण झाली आहे. याचाच अर्थ आमचा ग्रह आता हवामान अराजकता रोखता येणार नाही अशा स्थितीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.