देशातील पहिले क्रिप्टो थीम आधारित कॅफे भोपाळमध्ये
डिजिटल चलनाच्या वाढत्या प्रमाणादरम्यान भोपाळमध्ये एक असा कॅफे सुरू झाला आहे, जेथे तुम्ही क्रिप्टोकरन्सीद्वारे पेमेंट करू शकता. हा क्रिप्टोकरन्सी आधारित देशातील पहिला कॅफे आहे. तर देशातील पहिले क्रिप्टोकरन्सी आधारित रेस्टॉरंट दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये मागील वर्षापासून सुरू आहे.
क्रिप्टो विला अँड कॅफे भोपाळच्या रोहितनगर भागात आहे. हा कॅफे पूर्णपणे क्रिप्टोकरन्सी थीमवर आधारित आहे. येथील मेन्यू देखील क्रिप्टोकरन्सी थीमवरच तयार करण्यात आला आहे. कॅफे संचालक गौरव तिवारी यांच्यानुसार दीड महिन्यातच 30 हून अधिक लोकांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार केले आहेत. तसेच येथे भारतीय चलनातही पेमेंट करता येते.
कॅफेमध्ये क्रिप्टोकरन्सीशी मिळत्याजुळय़ात क्रिएटिव्ह डिशेस आहेत. क्रिप्टोकरन्सी कॉइनप्रमाणे डिझाइन फूड आइटम्स येथील वैशिष्टय़ आहे. कॅफेमध्ये एक चॉकलेट बॉम्ब नावाची डिश असून त्यातून चॉकलेट बॉम्ब फुटतो आणि आतून बिटकॉइन (खाता येणारा) निघतो.
या कॅफेचा उद्देश लोकांना जागरुक करणे असून याद्वारे लोक योग्य ठिकाणी आणि योग्यप्रकारे गुंतवणूक करू शकतील असे कॅफे संचालकाने म्हटले आहे. क्रिप्टोरन्सीच्या एका कॉइनची किंमत 20 हजार रुपयांपासून 30 लाख रुपयांपर्यंत आहे. क्रिप्टो विला अँड कॅफेमध्ये बिनान्स ऍपचा वापर करत पेमेंट करता येते. तेथे थेट क्रिप्टोकरन्सी टू क्रिप्टो पेमेंट होते. यासाठी ऍपवर अकौंट तयार करून क्रिप्टोकरन्सी खरेदी करावे लागते.