Tarun Bharat

बळीराजाला ज्ञान, अर्थव्यवस्थेला चालना देणारे प्रदर्शन; खा. संजय मंडलिक यांच्याकडून सतेज कृषी प्रदर्शनाचे कौतूक

कृषीतंत्रज्ञान शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न- आमदार सतेज पाटील; सोलापूर जिह्यातील अंकोलीचा खिलार खोंड ठरला चॅम्पियन ऑफ द शो; चार दिवसांच्या प्रदर्शनात दहा कोटींची उलाढाल

कोल्हापूर प्रतिनिधी

चार दिवसांच्या सतेज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून बळीराजाला कृषी क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाची परिपूर्ण माहिती मिळाली असून कृषी क्षेत्राशी निगडीत वस्तू, यंत्रे व अवजारांच्या विक्रीतून अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे, असे गौरवोद्गार खासदार संजय मंडलिक यांनी काढले. कळंबा येथील तपोवन मैदानावर 23 डिसेंबरपासून सुरु झालेल्या सतेज कृषी व पशु प्रदर्शनाचा सोमवारी समारोप झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मंडलिक बोलत होते. प्रदर्शनामध्ये सुमारे दहा कोटींची अर्थिक उलाढाल झाली.

हेही वाचा- सीमाबांधवांसाठी एक दिवस महाराष्ट्र बंद करा

खासदार मंडलिक म्हणाले, सतेज कृषी प्रदर्शनाचे हे चौथे वर्ष असून समारोपाच्या दिवशीही उद्घाटनाइतकीच गर्दी दिसत आहे. एखादी निवडणूक असो अगर कार्यक्रम त्याचे सुक्ष्म नियोजन करून कसे करायचे याचा आदर्श आमदार सतेज पाटील यांच्याकडून घेण्यासारखा आहे. आमदार पाटील यांचे सर्व कार्यकर्ते आणि त्यांची अजिंक्यतारा कार्यालयातील संपूर्ण टिम झोकून देऊन काम करत असल्यामुळेच त्यांचे प्रत्येक काम उल्लेखनीय आणि यशस्वी होते. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱयांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ व्हावा यासाठी सतेज पाटील यांचा नेहमी अट्टाहास असतो. प्रदर्शन पाहण्यासाठी झालेली शेतकऱयांची गर्दी पाहता त्यांची ध्येयपुर्ती झाल्याचे स्पष्ट होते. कोटय़वधीची अर्थिक उलाढाल झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे. पालकमंत्री म्हणूक काम करत असताना सतेज पाटील यांनी जिह्यातील पडिक जमिन शेतीसाठी पुन्हा वापरात आणून शेतकऱयांना ताकद कशी देता येईल यासाठी प्रयत्न केले आहेत.

पाणी व माती परिक्षणासाठी साखर कारखान्यांनी पुढाकार घ्यावा

कोल्हापूरातील शेतकरी स्वाभिमानी आहे. उपलब्ध शेतीतून जास्तीतजास्त उत्पादन काढण्यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न सुरु असतो. सांगली जिह्यातील काही शेतकऱयांकडून एकरी 130 टन उसाचे उत्पादन घेतले जाते. त्याच पद्धतीने कोल्हापूर जिह्यात ऊस उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱयांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. माती व पाणी परिक्षण करून त्यानुसार पिकांना खताची मात्रा देण्याची गरज आहे. यासाठी जिह्यातील सर्व साखर कारखान्यांनी पुढाकार घेऊन आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱयांच्या जमिनीतील मातीचे आणि सिंचनासाठी वापरल्या जाणाऱया पाण्याचे परिक्षण केल्यास उत्पादन वाढीसाठी शेतकऱयांना मोठा फायदा होणार आहे. नैसर्गिक आपत्ती आणि अडचणीच्या काळात राज्यसरकार नेहमी शेतकऱयांच्या पाठीशी ठामपणे उभारले आहे. जिह्यातील शेतकऱयांनी यापुढे पिकांमध्ये विविधता आणून कृषी उत्पादनामध्ये जिह्याचे नाव कायमपणे अग्रस्थानी ठेवावे असे आवाहन देखील खासदार मंडलिक यांनी केले.

कृषीतंत्रज्ञान शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न
कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून अद्ययावत कृषीतंत्रज्ञान शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. गेल्या चार दिवसांत कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी झालेली शेतकऱयांची गर्दी पाहता प्रयत्न यशस्वी ठरल्याचे स्पष्ट होते. प्रदर्शनातील स्टॉल, तेथे मेठय़ा प्रमाणात झालेली विक्री, शेतकऱयांना मिळालेले व्हर्टीकल शेतीचे तंत्रज्ञान या माध्यमातून प्रदर्शनाचा हेतू साध्य झाल्याचे समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन प्रदर्शनाचे आयोजक आमदार सतेज पाटील यांनी केले.

पुढील दहा वर्षात दहा कोटी लोकांचे जीवनमान उंचावू
शेतीमध्ये अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास निश्चितच उत्पादनामध्ये भरघोस वाढ होते. त्यामुळेच जिह्यातील धडाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी कृषी प्रदर्शन आयोजित करून शेतकऱयांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूरचे भूमीपूत्र विलास साळोखे हे चीनमध्ये अत्याधुनिक शेती करत आहेत. गुजरातमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष असतानाही एक शेतकरी लाखो रूपयांच्या स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेत आहे. अशा शेतकऱयांचा इतरांनी आदर्श घेण्याची गरज आहे. बीव्हीजी गुपच्या माध्यमातून ऍग्रो सेफ नावाचे हर्बल औषध तयार केले असून एकच औषध दहा रोगांवर काम करते. शेतकऱयांनी माती व पाणी परिक्षण करूनच खतांची आवश्यक मात्रा द्यावी. सर्वोत्तम कामासाठी झिजावे लागते याची जाणिव ठेवावी. पुढील दहा वर्षात देशातील दहा कोटी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही बी.व्ही.जी ग्रुपचे सर्वेसर्वा स्वच्छता दूत एच .आर.गायकवाड यांनी दिली.

अंकोलीचा खिलार खोंड ठरला चॅम्पियन ऑफ द शो
सतेज कृषी प्रदर्शनामध्ये सोलापूरमधील मोहोळ तालुक्याच्या अंकोली गावातील भारत मारुती भालेवार यांचा खिलार खोंड ‘चॅम्पियन ऑफ द शो’ ठरला. यावेळी सतेज कृषीरत्न पुरस्कार, ऊस स्पर्धा, फळे स्पर्धा, भाजीपाला स्पर्धा, फुले स्पर्धा, कृषी प्रक्रिया स्पर्धेतील विजेत्यांसह कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकऱयांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Related Stories

गाळमुक्त तलाव आणि सुशोभिकरणासाठी ग्रामस्थांचा लोकसहभाग कौतुकास्पद- तहसीलदार शीतल मुळे- भामरे

Abhijeet Khandekar

एक महिन्यात कोल्हापूरमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट

Archana Banage

आयसोलेशन हॉस्पिटलमधील लॅबटेक्निशियनला मुदतवाढ द्या

Archana Banage

ऍमेझॉनची ‘वी आर ऍमेझॉन’ मोहीम सुरू

Patil_p

मोरेवाडी येथे कार्यालयीन कामासाठी उपस्थित राहण्याचा पाचगाव तलाठ्यांना तहसीलदारांचा आदेश

Abhijeet Khandekar

नागासोबतचा जीवघेणा स्टंट पडला महागात

Archana Banage