गोडपदार्थांच्या प्रेमीला सुवर्णसंधी
मनाजोगी नोकरी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. जर ही नोकरी त्याच्या पसंतीच्या गोष्टीसोबत राहण्याची असेल तर त्याला अत्यानंदच होईल. अशाच प्रकारचा एक जॉब कॅनडातील एका कंपनीकडून देण्यात येत आहे. गोडपदार्थ आवडणाऱया लोकांसाठी हा ड्रीम जॉब असणार आहे. कंपनी स्वतःच्या कर्मचाऱयाला वर्षभर कँडी खाण्याच्या बदल्यात 61 लाख रुपयांचा पगार देणार आहे.
कँडीज आणि चॉकलेटची आवड असणाऱया लोकांसाठी कँडी फनहाउस नावाच्या ऑनलाईन रिटेल कंपनीने यासंबंधीची ऑफर दिली आहे. कँडीज पसंत असलेल्या व्यक्तीला ही कंपनी नोकरीवर ठेवू इच्छिते. कर्मचाऱयाला कँडी खाण्याच्या बदल्यात पैसे दिले जाणार आहेत.


कँडी फनहाउस कंपनीकडून चीफ कँडी ऑफिसरची नेमणूक केली जाणार आहे. या नोकरीसोबत अनेक प्रकारच्या सुविधा मिळणार आहेत. ऑनलाईन रिटेल कँडी फनहाउस चॉकलेट बारपासून कँडीजची विक्री करते. कँडींची चव घेऊन त्याचा योग्य अहवाल मांडणाऱया व्यक्तीची कंपनीला गरज आहे. या छोटय़ाशा कामासाठी कंपनी कर्मचाऱयाला 1 लाख डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 61.14 लाख रुपये वर्षाकाठी देण्यास तयार आहे. या नोकरीसाठी कर्मचाऱयाला ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, तर हे काम तो घरातूनच करणार आहे.
अजब कामाच्या अटी
या पदासाठी संबंधित व्यक्तीने वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली असावीत याची गरज नाही, तर 5 वर्षीय मुलगा देखील या नोकरीकरता अर्ज करू शकतो. परंतु त्याच्या आईवडिलांनी याकरता अनुमती देणे आवश्यक आहे. कँडी फनहाउसचे सीईओ जमील हेजाजी यांच्यानुसार कंपनीला या जाहिरातीकरता जबरदस्त प्रतिसाद प्राप्त होतोय. अनेक लोकांकडून अर्ज प्राप्त झाले आहेत. सोशल मीडियावर या जाहिरातीची चर्चा होत असून अनेक जण कंपनीचा व्हिडिओ शेअर करत आहेत.